पुणे, नागपूर, सातारा, कोल्हापूरच्या धर्तीवर प्रशासनाचा मोठा निर्णय; वापर, भाड्याने देणे, पुरवठा आणि उपलब्ध करून देण्यावरही निर्बंध
कोपरगाव वृत्तवेध : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकीत कानठळ्या बसविणाऱ्या डॉल्बीच्या दणदणाटाला अखेर प्रशासनाने ब्रेक लावला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात १४ सप्टेंबरपासून २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि उच्च आवाजाच्या ध्वनीवर्धकांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३(१) अन्वये हा आदेश जारी केला आहे. अशी माहिती कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉल्बीचा आवाज आता खपवून घेतला जाणार नाही!
गणेश विसर्जन आणि नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डॉल्बीच्या वाढत्या आवाजामुळे वृद्ध, रुग्ण, गर्भवती महिला, लहान मुले तसेच सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास प्रशासनाच्या निदर्शनास आला होता. ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होण्यासोबतच सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही आदेशात व्यक्त करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे डॉल्बी चालक व मालकांना यापूर्वी नोटिसा देण्यात आल्या, बैठकीत समज देण्यात आली; मात्र तरीही विविध सणांच्या मिरवणुकांमध्ये डॉल्बीचा वापर सुरूच राहिल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्यामुळे यंदा प्रशासनाने थेट प्रतिबंधात्मक आदेश काढला आहे.
फक्त वाजविण्यावर नाही, तर पुरवठ्यावरही बंदी!
प्रशासनाचा आदेश केवळ डॉल्बी वाजविण्यापुरता मर्यादित नाही. डॉल्बी सिस्टीम वापरणे, भाड्याने देणे, पुरवठा करणे किंवा उपलब्ध करून देणे यावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे उत्सवाच्या नावाखाली नियमांना बगल देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची अडचण वाढणार आहे.
वृत्तवेधच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात वृत्तवेधने सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. उत्सवाचा आनंद सर्वांना मिळावा; मात्र त्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये, ही भूमिका सातत्याने मांडण्यात आली. अखेर प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल घेतली.पुणे, नागपूर, सातारा, कोल्हापूर यांसारख्या मोठ्या शहरांच्या धर्तीवर अहिल्यानगर जिल्ह्यातही डॉल्बीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रशासनाच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.
आदेश मोडाल तर कारवाईचा दणका!
बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे डॉल्बी चालक, मालक आणि आयोजकांनी प्रशासनाच्या आदेशाची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.
उत्सव भक्तीचा असावा, कानठळ्या बसविणाऱ्या दणदणाटाचा नव्हे!
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
