शिर्डी | वृत्तवेध
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री साईबाबा संस्थानात भक्तिभावाचा महासागर उसळला. देशभरातून शिर्डीत दाखल झालेल्या हजारो साईभक्तांनी समाधी दर्शन, आरती, पालखी सोहळा आणि साईप्रसादालयातील महाप्रसादाचा लाभ घेतला.
विशेष म्हणजे साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचा रात्रीपर्यंत तब्बल ४५ हजार भाविकांनी लाभ घेतल्याची माहिती संस्थानच्या प्रसादालय विभागाने दिली, तर २८ हजार ९८३ अन्नपाकिटांचेही वितरण करण्यात आले.
आषाढी एकादशी हा श्री साईबाबांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. साईबाबांनी त्यांचे परमभक्त दासगणू महाराजांना भगवान विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिल्याच्या परंपरेचे स्मरण करत हा स्थानिक उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदाही श्री साईबाबांच्या समाधी चौथऱ्यावर भगवान विठ्ठलाची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती. संपूर्ण समाधी मंदिर आणि परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता, तर धूप आरतीवेळी विठ्ठलाची पारंपरिक मराठी आरती गाऊन भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
उत्सवानिमित्त ह.भ.प. दिगंबर महाराज बोरसे (राहाता) यांच्या कीर्तनाने भक्तांना अध्यात्मिक मेजवानी मिळाली. त्यानंतर श्रींच्या पालखीची शिर्डी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि साईनामाच्या जयघोषात निघालेल्या पालखी सोहळ्याने संपूर्ण शिर्डी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
महाप्रसादाच्या नियोजनासाठी संस्थानने मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती. सुमारे ६० पोते साबुदाणा, ४५ पोते शेंगदाणे, ९०० किलो शेंगदाणा तेल, २ हजार ५०० किलो बटाटे तसेच इतर आवश्यक साहित्य वापरून हजारो भाविकांसाठी खिचडीचा महाप्रसाद तयार करण्यात आला.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन संस्थानने दर्शन, प्रसाद आणि पालखी सोहळ्याचे नियोजन सुरळीत पार पाडले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिर्डीमध्ये दिवसभर ‘साईराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल’च्या अखंड जयघोषाने भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
