आ. आशुतोष काळे यांची घोषणा; व्यापाऱ्यांनाही दिलासा
कोपरगाव : वृत्तवेध ऑनलाईन राजेंद्र सालकर
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना यंदा एकरकमी २० टक्के दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे. कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. बोनसपोटी सुमारे साडेपाच कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या हाती येणार असल्याने स्थानिक बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
संस्थापक माजी खासदार स्व. कर्मवीर शंकरराव काळे यांनी ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे हित जपत दरवर्षी भरघोस दिवाळी बोनस देण्याची परंपरा सुरू केली. ही परंपरा आजही कायम ठेवत यंदाही कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बोनसची रक्कम दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात येणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.
पगारवाढीच्या फरकाची रक्कमही अदा
कारखाना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार १० टक्के पगारवाढीच्या फरकाच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम ऑगस्ट महिन्यात अदा करण्यात आली आहे. कर्मचारी हिताच्या दृष्टीने कारखाना व्यवस्थापनाकडून विविध निर्णय घेतले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ऊस उत्पादकांनाही वाढीव रकमेचा लाभ
२०२५-२६ च्या हंगामातील ऊसाला प्रतिमेट्रिक टन ३ हजार रुपये पहिली उचल दिल्यानंतर जूनमध्ये आणखी १०० रुपये देण्यात आले होते. त्यानंतर कार्यक्षेत्रातील ऊसासाठी प्रतिटन १५० रुपये वाढ आणि ५० रुपये प्रोत्साहनपर अनुदान, अशी एकूण २०० रुपये अतिरिक्त रक्कम, तर कार्यक्षेत्राबाहेरील ऊसासाठी प्रतिटन १५० रुपये देण्यात आले. ही रक्कम दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ऊस उत्पादकांच्या बँक खात्यांत जमा करण्यात आल्याचे कारखान्याकडून सांगण्यात आले.
बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढण्याची अपेक्षा
कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुमारे साडेपाच कोटी रुपयांच्या बोनसची रक्कम बाजारात आल्याने दिवाळीच्या खरेदीला चालना मिळण्याची शक्यता आहे. कपडे, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर वस्तूंच्या खरेदीतून स्थानिक व्यापारी व छोट्या व्यावसायिकांनाही फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
युनियन पदाधिकाऱ्यांकडून आभार
बोनस जाहीर केल्याबद्दल कारखाना कर्मचारी युनियनचे जनरल सेक्रेटरी नितीन गुरसळ आणि सेक्रेटरी प्रकाश आवारे यांनी आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करून आभार मानले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, डिस्टिलरीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी संदीप शिरसाठ आणि चीफ अकाउंटंट वैभव काळे उपस्थित होते.
वृत्तवेध ऑनलाईन कोपरगाव
बातमी: राजेंद्र सालकर
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
