NEP-2020 अनुषंगाने भौतिकशास्त्र अभ्यासक्रमाला नवी दिशा; कोपरगावात तज्ज्ञांचे मंथन

कोपरगाव| वृत्तवेध: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP-2020) च्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर टी.वाय. बी.एस्सी. (भौतिकशास्त्र) अभ्यासक्रम अधिक आधुनिक, विद्यार्थीकेंद्री आणि रोजगाराभिमुख करण्यासाठी कोपरगावात तज्ज्ञ प्राध्यापकांचे व्यापक मंथन झाले. अभ्यासक्रमात संशोधन, प्रकल्पाधारित अध्ययन, कौशल्यविकास आणि उद्योगाभिमुख घटकांचा प्रभावी समावेश करण्यावर या कार्यशाळेत एकमताने भर देण्यात आला.

रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळ, महाविद्यालयाचा भौतिकशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पंडित शेळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. संदीप वर्पे होते.

प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी नव्या अभ्यासक्रमात संशोधन, प्रात्यक्षिके, नवोपक्रम, कौशल्यविकास आणि रोजगारक्षमतेवर विशेष भर देण्यात आल्याचे सांगितले. कार्यशाळेत प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करून अंतिम अभ्यासक्रम निश्चित केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय समारोपात ॲड. संदीप वर्पे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य करण्यासाठी अभ्यासक्रम सातत्याने अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे सांगत अशा शैक्षणिक कार्यशाळांचे महत्त्व अधोरेखित केले.

तांत्रिक सत्रात प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते यांनी ‘जनरल फिजिक्स’ हा विषय अधिक संकल्पनाधारित, प्रयोगशील, संशोधनाभिमुख आणि कौशल्याधारित करण्याची आवश्यकता मांडली. त्यानंतर डॉ. रमेश भिसे आणि डॉ. शिवाजी भोसले यांनी अभ्यासक्रमाची रचना, श्रेयांक (Credits), मूल्यमापन पद्धती आणि अध्यापनातील बदलांचे सविस्तर सादरीकरण केले. डॉ. रामनाथ पवार आणि डॉ. अनिल गर्जे यांनी अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शन केले.

मुक्त चर्चासत्रात पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील प्राचार्य, विभागप्रमुख, भौतिकशास्त्र प्राध्यापक आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी अभ्यासक्रम अधिक व्यावहारिक, संशोधनाभिमुख आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक गरजांशी सुसंगत करण्यासाठी विविध सूचना मांडल्या.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती पाटील आणि प्रा. पी. बी. जामदार यांनी केले, तर आभार प्रा. ए. आर. कदम यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, डॉ. अर्जुन भागवत, डॉ. घनश्याम भगत, डॉ. निलेश मालपुरे, प्रा. मोहनसिंग पाडवी, प्रा. एस. एस. अदोणे, प्रा. ए. आर. कदम, सौ. एफ. एस. मुलाणी, सौ. बी. के. पाचपिंड तसेच कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles