कोपरगाव वृत्तवेध:
यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने ऊस पिकाच्या वाढीवर परिणाम झाला असून गाळपासाठी उपलब्ध होणाऱ्या उसाचे प्रमाण आणि साखर उताऱ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम आव्हानात्मक राहणार असला तरी शासनाच्या निर्देशानुसार १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करणे अनिवार्य आहे, असे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
कारखान्याच्या ७२व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात ते बोलत होते. कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. व्हाइस चेअरमन दिनार कुदळे व त्यांच्या पत्नी प्रियाताई कुदळे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून बॉयलर अग्नीप्रदीपन करण्यात आले.
उपलब्ध उसाचे नियोजन महत्त्वाचे
आमदार काळे यांनी सांगितले की, कमी पावसामुळे यंदा उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्याचा परिणाम गाळपासाठी उपलब्ध होणाऱ्या उसाच्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे ऊस लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता असून काही भागांत ऊस चाऱ्यासाठी वापरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पुढील २०२७-२८च्या गळीत हंगामावरही होण्याची शक्यता आहे.
उपलब्ध उसाचे योग्य नियोजन करून अधिकाधिक गाळप करणे आवश्यक आहे. हंगाम सुरळीत सुरू करण्यासाठी ऊसतोडणी कामगारांना अॅडव्हान्स वाटप पूर्ण करण्यात आले असून कारखान्याची यंत्रणा गाळपासाठी सज्ज करण्यात आली आहे.
समन्वयातून हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन
उपलब्ध उसाचे अधिकाधिक गाळप करून हंगाम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, ऊसतोडणी कामगार आणि ऊस उत्पादक सभासदांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन आमदार काळे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन डेप्युटी सेक्रेटरी संदीप शिरसाठ यांनी केले, तर आभार संचालक सूर्यभान कोळपे यांनी मानले.
यावेळी कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, संचालक, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक उपस्थित होते.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
