कोपरगाव वृत्तवेध:
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये यंदाही वारकरी परंपरेचा संस्कारमय वारसा जपत भव्य शालेय दिंडी, रिंगण सोहळा आणि हरिनामाच्या अखंड गजरात भक्तिमय वातावरणाची निर्मिती करण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणीच्या नामस्मरणाने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. आधुनिक शिक्षणासोबत भारतीय संस्कृती, संतपरंपरा आणि नैतिक मूल्यांची प्रभावी सांगड घालणारा हा उपक्रम नागरिकांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. रेखा जाधव यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व सांगत वारकरी संप्रदायाची परंपरा व संतांच्या विचारांची प्रेरणादायी ओळख करून दिली.
त्यानंतर कला-संगीत शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण आणि संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी अभंग, भजने, गवळणी आणि विठ्ठलनामाचा अखंड गजर सादर करून वातावरण भक्तिमय केले.
यावेळी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे विधिवत पूजन तसेच अश्वपूजन करून सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांची भव्य दिंडी हनुमान ग्राउंडकडे प्रस्थान झाली.
हनुमान ग्राउंडवर पार पडलेल्या रिंगण सोहळ्यात विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध सहभाग नोंदवत हरिनामाच्या अखंड गजरात विठ्ठलभक्तीचा अविस्मरणीय अनुभव साकारला. वाढत्या विद्यार्थी संख्येनुसार करण्यात आलेले उत्कृष्ट नियोजन, पारंपरिक वेशभूषा आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे उपस्थित पालक, शिक्षक व नागरिकांना प्रत्यक्ष पंढरपूर वारीचा अनुभव मिळाल्याची भावना व्यक्त झाली.
या संस्कारमय उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकरावजी काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे, सचिव सौ. चैतालीताई काळे, इन्स्पेक्टर नारायण बारे, संस्थेचे सर्व सदस्य तसेच पालकांनी विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फिजिकल डायरेक्टर रमेश पठारे यांच्यासह ज्योती शेलार, राजेंद्र आढाव, इसाक सय्यद, नसीर पठाण, जगदीश गिरी आणि प्रकाश भुजबळ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप रमेश पठारे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
विशेष : शिक्षणासोबत संस्कारांची जोपासना हेच आमचे ध्येय – सौ. चैताली काळे
“आषाढी एकादशी हा श्रद्धा, भक्ती आणि संस्कारांचा उत्सव आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि नैतिक मूल्यांचे संस्कार मिळावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
दिंडी आणि रिंगण सोहळ्यासारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सेवाभाव, सामूहिकता आणि भक्तीभाव दृढ होतो. शिक्षण आणि संस्कार यांची सांगड घालणे हेच आमचे ध्येय असून भविष्यातही असे संस्कारमय उपक्रम सातत्याने राबविण्यास संस्था कटिबद्ध आहे,” असे संस्थेच्या सचिव सौ. चैताली काळे यांनी सांगितले.
आपल्या परिसरातील बातमी असेल तर ही पोस्ट आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर करा.अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
