कोपरगाव | वृत्तवेध
कोपरगावच्या संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्लेसमेंट हंगामात अभूतपूर्व यश संपादन करत राज्यातील आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. यंदा तब्बल ९१७ विद्यार्थ्यांची २०० हून अधिक नामांकित देशी-विदेशी कंपन्यांमध्ये निवड झाली असून, एका विद्यार्थ्याला जपानमधील एसएमसी कंपनीने तब्बल ₹३२ लाखांचे वार्षिक पॅकेज देत सर्वाधिक ऑफर दिली आहे.
संजीवनीच्या विद्यार्थ्यांवर जागतिक उद्योगविश्वाचा वाढता विश्वास यंदाच्या प्लेसमेंटमध्ये स्पष्टपणे दिसून आला. क्रेडने ₹३० लाख, टॉपी इंडस्ट्रीज (जपान)ने ₹२५ लाख, डायकिन एअर टेक्नॉलॉजी (जपान)ने ₹२२ लाख, आयसीन (जपान)ने ₹२० लाख, ओपन अप कन्स्ट्रक्शन (जपान)ने ₹१७ लाख, अवलारा ₹१४.५० लाख आणि जस्पेने ₹११ लाखांचे वार्षिक पॅकेज जाहीर करत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक करिअरच्या संधी खुल्या केल्या.
यंदाच्या प्लेसमेंट मोहिमेत टीसीएस, जॉन्सन कंट्रोल्स इंटरनॅशनल, विसेन इन्फोटेक, फिलिप्स ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस, वेस्को डिजिटल इनोव्हेशन सेंटर, बॉश लिमिटेड, गोदरेज इन्फोटेक, महिंद्रा अँड महिंद्रा, फॉरेसिया आणि फॉर्विस माझार्स यांसारख्या देश-विदेशातील आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची निवड केली. यामुळे संजीवनीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाला पुन्हा एकदा जागतिक मान्यता मिळाली आहे.
विभागनिहाय पाहता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे ११९, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे १०५, मेकॅनिकलचे १५४, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटरचे ८५, इलेक्ट्रिकलचे ९१, सिव्हिलचे ७९, मेकॅट्रॉनिक्सचे ९०, स्ट्रक्चरलचे ५८ आणि एमबीए विभागाचे १३६ विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये निवडले गेले.
२०१९ पासून स्वायत्त (ऑटोनॉमस) दर्जा प्राप्त झाल्यानंतर संजीवनीने उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, आधुनिक प्रयोगशाळा, कौशल्याधारित प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल्स आणि जागतिक रोजगारक्षमतेवर विशेष भर दिला आहे. त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी प्लेसमेंटची संख्या आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या वेतन पॅकेजमध्ये सातत्याने वाढ होत असून, संजीवनी राज्यातील सर्वोत्तम प्लेसमेंट देणाऱ्या अभियांत्रिकी संस्थांपैकी एक म्हणून उदयास आली आहे.
“प्रत्येक यशस्वी प्लेसमेंट म्हणजे केवळ एका विद्यार्थ्याची नोकरी नव्हे, तर त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यभराच्या स्वप्नांची पूर्तता,” या ध्येयाने संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे या विक्रमी यशातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वृत्तवेध विश्लेषण
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी नव्हे, तर उद्योगसज्ज कौशल्ये महत्त्वाची ठरत आहेत. संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ९१७ प्लेसमेंट्स आणि ₹३२ लाखांच्या सर्वोच्च पॅकेजने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, हे पुन्हा सिद्ध केले आहे.
