कोपरगाव: महाराष्ट्रातील विनाअनुदानित पॉलिटेक्निक संस्थांमध्ये सर्वप्रथम स्वायत्त (ऑटोनॉमस) दर्जा प्राप्त करणाऱ्या संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकने पहिल्याच ऑटोनॉमस बॅचच्या निकालातून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली जाहीर झालेल्या प्रथम वर्षाच्या निकालात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेची वर्षा दादासाहेब भुजाडे हिने ९६.४३ टक्के गुणांसह सर्व शाखांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी शाखेची कीर्ती सोमनाथ शिंदे (९५.८६ टक्के) हिने द्वितीय, तर समीक्षा योगेश हाडोळे (९५.३६ टक्के) हिने तृतीय क्रमांक पटकावत उत्कृष्ट गुणवत्तेचे प्रदर्शन केले.
मेकॅट्रॉनिक्स शाखेत शालुकुमारी शाह (९५), पार्थ पिसाळ (९४.९५) आणि देविका घोंगाणे (९४.०७), मेकॅनिकल शाखेत आकांक्षा पळसकर (९२.७१), शालिनी कडू (९२.६४) व श्रीहरी देव्हारे (९२.५७), इलेक्ट्रिकलमध्ये समर्थ मुळे (९३.५७) व ज्ञानेश्वरी गणर (९३.०७), तर सिव्हिल शाखेत आदिती वल्टे (९२.३६), हर्षदा नवले (८९.७९) आणि प्रांजली चिने (८६) यांनीही उल्लेखनीय यश मिळविले.
प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी सांगितले की, स्वायत्त दर्जामुळे उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, अद्ययावत शिक्षणपद्धती, सातत्यपूर्ण मूल्यमापन आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर दिला जात असून त्याचे सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालातून स्पष्टपणे दिसून येत आहेत. रोजगारक्षम आणि उद्योगस्नेही विद्यार्थी घडविण्याच्या दिशेने संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
संजीवनी संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या. पहिल्याच ऑटोनॉमस बॅचने मिळविलेल्या या दैदिप्यमान यशामुळे संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकने तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता, विश्वासार्हता आणि उत्कृष्टतेचा नवा मानदंड निर्माण केल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
