कोपरगाव : ग्रामीण भागातून सुरू झालेली समता पतसंस्था आज अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल बँकिंग आणि सोनेतारण कर्ज क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करत आहे. नाशिक येथील आरिया रिसॉर्ट अँड पार्क येथे आयोजित ‘नवपर्व’ वार्षिक आढावा बैठक २०२५-२६ मध्ये संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सहकारी बँका व पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा कॉसमॉस सहकारी बँकेचे माजी चेअरमन मिलिंद काळे यांनी समता पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा (काका) कोयटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद काळे, तर प्रेरणादायी वक्ते म्हणून मनीष गुप्ता उपस्थित होते.
आपल्या भाषणात मिलिंद काळे म्हणाले की, “सोनेतारण कर्ज क्षेत्र हे सर्वाधिक सुरक्षित क्षेत्र मानले जाते. या क्षेत्रात समता पतसंस्थेने उल्लेखनीय यश मिळवले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोयटे सभासदांना जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी सातत्याने नवे उपक्रम राबवत आहेत. समता ही केवळ संस्था नसून एक मोठा परिवार आहे आणि अधिकारी-कर्मचारी हीच तिची खरी ताकद आहे.”
प्रेरणादायी वक्ते मनीष गुप्ता यांनी ध्येय, नियोजन आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून संस्थेला नव्या उंचीवर नेण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर काका कोयटे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. स्वागतपर मनोगत व्हाइस चेअरमन अरविंद पटेल यांनी व्यक्त केले. संस्थेचा वार्षिक आढावा जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी सादर केला, तर प्रास्ताविक संदीप कोयटे यांनी केले.
यावेळी मागील वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाखा आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. ठेव वाढीत कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर आणि शिर्डी शाखांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सोनेतारण कर्ज वितरणात येवला, पुणे, वैजापूर, श्रीरामपूर, जामखेड, पंचवटी, पुंडलिकनगर, नेवासा, निफाड आणि नांदगाव शाखांचा सन्मान करण्यात आला. ठेव व कर्ज या दोन्ही क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरीबद्दल येवला, पुणे, शिर्डी आणि संगमनेर शाखांना विशेष गौरव देण्यात आला.
कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी योगेश मोरे, कोल्हार शाखेचे व्यंकटेश वैष्णव, शिर्डी शाखेचे शशिकांत सोनवणे आणि पुणे शाखेचे निरंजन शिर्के यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
समारोपावेळी चेअरमन काका कोयटे यांनी सांगितले की, “चाळीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागातून सुरू झालेली समता आज मोबाईल बँकिंग, पेपरलेस, व्हाउचरलेस आणि सेल्फ बँकिंगसारख्या आधुनिक सुविधा देत नवे शिखर गाठत आहे. संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकजूट हीच समतेची खरी ताकद असून नव्या पर्वात संस्थेला आणखी उंचीवर नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे.”
कार्यक्रमाला व्हाइस चेअरमन अरविंद पटेल, ज्येष्ठ संचालक जितेंद्र (जितूभाई) शहा, संचालक मंडळातील सदस्य, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
