सेवानिवृत्ती नोकरीची असते; नात्याची नाही! – आमदार आशुतोष काळे

कोपरगाव : सहकार क्षेत्रात केवळ उत्पादन, नफा आणि आर्थिक प्रगतीच महत्त्वाची नसून कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यातील जिव्हाळ्याचे नातेही तितकेच महत्त्वाचे असल्याचा आदर्श कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने पुन्हा एकदा घालून दिला.

कारखाना व आसवनी विभागातील ४१ कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कुटुंबीयांसह आयोजित सत्कार समारंभात कारखान्याचे चेअरमन तथा आमदार आशुतोष काळे यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, “सेवानिवृत्ती ही नोकरीची असते; नात्याची कधीच नसते,” असे भावनिक उद्गार काढले.

कारखाना आणि उद्योग समूहाच्या यशामागे कर्मचाऱ्यांचे कष्ट, निष्ठा आणि प्रामाणिकपणा हेच सर्वात मोठे भांडवल असल्याचे सांगताना त्यांनी स्वर्गीय माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे, माजी आमदार अशोकदादा काळे आणि स्वतःच्या सामाजिक-राजकीय प्रवासात कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याची आठवण करून दिली. कर्मचाऱ्यांच्या विश्वासामुळेच जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुढील आयुष्यात कुटुंबीयांसोबत अधिक वेळ घालवण्याचा, आवडी-निवडी जोपासण्याचा आणि नातवंडांसह आनंदी जीवन जगण्याचा सल्ला देताना, “या संस्थेचे दरवाजे तुमच्यासाठी कायम खुले राहतील,” अशी भावनिक ग्वाहीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाला व्हाइस चेअरमन प्रवीण शिंदे, संचालक मंडळातील सदस्य, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद, सहाय्यक सेक्रेटरी संदीप शिरसाठ, विविध विभागप्रमुख, निवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक सेक्रेटरी संदीप शिरसाठ यांनी केले, तर आभार व्हाइस चेअरमन प्रवीण शिंदे यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles