कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचा उपक्रम; गाळप हंगाम संपेपर्यंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवाह राहणार सुरू
कोपरगाव : ऊसतोडणी कामगारांच्या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने कारखाना परिसरात ‘साखर शाळा’ सुरू केली आहे. कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या शाळेचे उद्घाटन कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका गटशिक्षण अधिकारी पिंकी वाजे यांच्या हस्ते झाले.
ऊसतोड कामगार आले; मुलांच्या शिक्षणाचीही सोय
साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर विविध भागांतून ऊसतोडणी कामगार कारखाना परिसरात दाखल झाले आहेत. कामाच्या निमित्ताने स्थलांतर करणाऱ्या या कुटुंबांतील मुलांचे शिक्षण अनेकदा खंडित होते. ही अडचण लक्षात घेऊन कारखाना कार्यस्थळावरील श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयाच्या माध्यमातून साखर शाळा सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना स्थलांतराच्या काळातही शिक्षण सुरू ठेवता येणार आहे.
शैक्षणिक साहित्य, पोषण आहार अन् हसत-खेळत शिक्षण
साखर शाळेत विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच शैक्षणिक साहित्य आणि फळांचे वाटप करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार देण्यात येणार असून, हसत-खेळत शिक्षण मिळावे यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गाळप हंगाम संपेपर्यंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवाह खंडित होऊ नये, याची काळजी कारखाना व्यवस्थापन घेणार आहे.
‘शिक्षण हा कारखान्यासाठी जिव्हाळ्याचा विषय’
कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे म्हणाले की, कर्मवीर शंकरराव काळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले. त्यामुळे शिक्षण हा कारखान्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. माजी आमदार अशोकराव काळे व चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली साखर शाळा सुरू करण्यात आली असून, तिच्या कामकाजाकडे कारखाना व्यवस्थापनाचे लक्ष राहणार आहे.
गटशिक्षण अधिकारी पिंकी वाजे यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. स्थलांतरित ऊसतोडणी कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी साखर शाळा उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार असून कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वेळीकार्यक्रमास असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, चीफ अकौंटंट वैभव काळे, शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे, ऊस विकास अधिकारी भाऊसाहेब चिने, सुरक्षा अधिकारी राजेंद्र धुमाळ, विविध खात्यांचे प्रमुख, तालुका केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, ऊसतोडणी कामगार, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यांनी केले. मुख्याध्यापक रवींद्र शिंदे यांनी आभार मानले.
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : पत्रकार राजेंद्र सालकर
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
