रस्त्यांची धूळ-कचरा आता मशीनने होणार साफ; अत्याधुनिक डस्ट कलेक्टरचा शुभारंभ, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान
कोपरगाव : शहरातील रस्त्यांवर उडणारी धूळ, साचणारा कचरा आणि पारंपरिक पद्धतीच्या स्वच्छतेमुळे निर्माण होणारा त्रास कमी करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने स्वच्छतेच्या कामात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. अत्याधुनिक डस्ट कलेक्टर अर्थात स्वीपर मशीन आता शहरातील रस्त्यांची धूळ आणि कचरा यांत्रिक पद्धतीने संकलित करणार आहे. या मशीनचा शुभारंभ गुरुवारी (दि. ५) श्री साईबाबा कॉर्नर येथे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.
मशीनचे विधिवत पूजन करून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. आतापर्यंत शहरातील रस्त्यांची स्वच्छता प्रामुख्याने झाडूच्या माध्यमातून केली जात होती. मात्र, झाडू मारताना धूळ उडत असल्याने स्वच्छता करतानाच धुळीचा त्रास निर्माण होत होता. ही समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेने यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छ करण्यासाठी स्वीपर मशीन उपलब्ध करून दिले आहे.
धूळ उडवणाऱ्या झाडूऐवजी आता धूळ खेचणारे मशीन!
स्वीपर मशीनच्या माध्यमातून रस्त्यांवरील धूळ, माती आणि कचरा संकलित केला जाणार आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने या यंत्राचा नियमित वापर केल्यास शहरातील स्वच्छता अधिक गतिमान होण्याबरोबरच रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
‘स्वच्छ कोपरगाव, सुंदर कोपरगाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र, मशीन उपलब्ध झाल्यानंतर त्याचा नियमित आणि प्रभावी वापर होणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
स्वच्छतेच्या खऱ्या शिलेदारांचा सन्मान
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज रस्त्यावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिला व पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांचा यावेळी स्नेहलताताई कोल्हे आणि नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्वच्छ आणि सुंदर शहराच्या निर्मितीत स्वच्छता कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, “दिवाळीपूर्वी आपण घराची स्वच्छता करतो, त्याचप्रमाणे आपले शहरही स्वच्छ असणे गरजेचे आहे. शहरातील धूळ संकलित करून स्वच्छता अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने हे मशीन उपलब्ध करण्यात आले आहे.” नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष पराग संधान यांनी शहरवासीयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेकडून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. शहर धुळमुक्त करण्यासाठी स्वीपर मशीन उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्याधिकारी अजित निकत, आरोग्य सभापती वैभव आढाव, नगरसेवक-नगरसेविका, नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
🔶 चौकट | मशीन आले; आता नियमित वापराचे आव्हान!
अत्याधुनिक स्वीपर मशीनमुळे कोपरगावच्या रस्त्यांची स्वच्छता अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, शहर खऱ्या अर्थाने धुळमुक्त करण्यासाठी मशीनची उपलब्धता पुरेशी नसून त्याचा नियमित वापर, योग्य देखभाल आणि नियोजनबद्ध स्वच्छता मोहीमही आवश्यक आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या या नव्या यंत्रणेचा प्रत्यक्ष परिणाम आगामी काळात किती दिसतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
वृत्तवेध ऑनलाईन : पत्रकार राजेंद्र सालकर
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
