कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन राजेंद्र सालकर:
दिवाळीच्या सणात हजारो प्रवाशांना त्यांच्या गावी, माहेरी आणि नातेवाइकांकडे सुरक्षितपणे पोहोचविणाऱ्या एसटी चालक-वाहकांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम कोपरगावात राबविण्यात आला. धनत्रयोदशीच्या दिवशी शुक्रवारी (दि. ६ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता कोपरगाव बस आगारातील कार्यालयात ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने चालक, वाहक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
कैलासवासी दगडू महाराज उपाध्ये यांच्या स्मरणार्थ गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात असल्याचे डॉ. विलास आचारी यांनी सांगितले. दिवाळीच्या काळात शहरासह खेड्यापाड्यांतील नागरिक, माता-भगिनी आणि लहान मुले प्रवास करतात. त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचविण्याची जबाबदारी एसटी कर्मचारी पार पाडतात. त्यामुळे त्यांच्या दिवाळीतही आनंदाचा क्षण निर्माण व्हावा, या सामाजिक भावनेतून फराळ वाटप केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोपरगावच्या पहिल्या एसटीच्या आठवणींना उजाळा
ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष विजुभाऊ बंब यांनी कोपरगावातील एसटी सेवेच्या सुरुवातीच्या आठवणी सांगितल्या. स्वर्गीय भागचंदभाऊ ठोळे यांनी सामान्य नागरिकांच्या अडचणी ओळखून कोपरगावात पहिली एसटी सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे भागचंदभाऊ ठोळे यांना स्वतः एसटीने प्रवास करण्याचा योग आला नाही; मात्र सामान्य नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांनी एसटी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले, हे त्यांच्या सामाजिक जाणिवेचे उदाहरण असल्याचे बंब यांनी नमूद केले.

‘फराळ नव्हे, कृतज्ञतेचा घास’
पत्रकार राजेंद्र सालकर म्हणाले, “दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई नव्हे, तर माणसामाणसांतील आपुलकीचा दिवा प्रज्वलित करण्याचा सण आहे. एसटी चालक-वाहक ऊन, पाऊस आणि सण-उत्सवाची पर्वा न करता सेवा बजावतात. आजचा फराळ हा केवळ गोडधोड नसून त्यांच्या सेवेला ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने दिलेली प्रेमाची, सन्मानाची आणि कृतज्ञतेची भेट आहे. आपल्या आनंदाची एक पणती दुसऱ्याच्या आयुष्यात लावली, तरच सणाचे खरे सार्थक होते.”
चालक-वाहकांसाठी मोफत योगवर्ग
योगाचार्य उत्तमभाई शहा यांनी चालक-वाहकांच्या धावपळीच्या कामात योगासने आणि प्राणायामाचे महत्त्व स्पष्ट केले. नियमित योगामुळे शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते, असे सांगत त्यांनी आगारातील चालक-वाहकांसाठी मोफत योगवर्ग घेण्याची घोषणा केली. सर्व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
‘एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीही गोड व्हावी’
आभार व्यक्त करताना आगारप्रमुख अमोल बनकर यांनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले. शहरात अनेक शासकीय व सहकारी संस्था असूनही ज्येष्ठ नागरिक संघ गेल्या अनेक वर्षांपासून एसटी चालक-वाहकांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करतो, ही विशेष बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवाळीच्या काळात अनेक जण कुटुंबासोबत सण साजरा करतात; मात्र एसटी चालक-वाहक प्रवाशांना त्यांच्या गावी पोहोचविण्याच्या सेवेत व्यस्त असतात. या सेवाव्रती कर्मचाऱ्यांची दिवाळीही गोड व्हावी, या सामाजिक दायित्वातून हा उपक्रम राबविला जात असल्याचे बनकर यांनी सांगितले. आगारातील अधिकारी, कर्मचारी, चालक व वाहकांच्या वतीने त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष विजुभाऊ बंब, महिला अध्यक्ष सुधाभाभी ठोळे, सौ. शोभा ठोळे, योगाचार्य उत्तमभाई शहा, डॉ. विलास आचारी, देवीचंद बंब, श्रीमती कमलाताई उपाध्ये, कैलास पाटणी तसेच आगारप्रमुख अमोल बनकर, एसटी अधिकारी, कर्मचारी, चालक व वाहक उपस्थित होते.
वृत्तवेध ऑनलाईन : पत्रकार राजेंद्र सालकर
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
