१० सॅमसंग टॅब अन् लॅपटॉप पोलिसांनी हस्तगत; तांत्रिक विश्लेषणातून गुन्ह्याचा उलगडा
कोपरगाव : तळेगाव मळे येथील जिल्हा परिषद शाळेची खिडकी फोडून शैक्षणिक साहित्याची चोरी करणाऱ्या दोघांना कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले १० सॅमसंग टॅब आणि लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप असा ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या चोरीचा छडा लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
खिडकीची काच फोडून शाळेत प्रवेश
तळेगाव मळे येथील जिल्हा परिषद शाळेत ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या खिडकीची काच फोडून आत प्रवेश केला. यावेळी १० सॅमसंग टॅब, लिनोव्हा लॅपटॉप आणि रेडमी मोबाईल असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.
या प्रकरणी शिक्षक सुनील कारभारी ढेपले यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहिती अन् तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा शोध
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत तपास सुरू ठेवला. त्यातून सागर सोमनाथ इंगळे (२२, रा. इंगळे वस्ती, वैजापूर) आणि अमोल आजीनाथ वैद्य (२३, रा. तळेगाव मळे) यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.
त्यानंतर पोलिस पथकाने दोघांना तळेगाव मळे शिवारातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
४७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले १० सॅमसंग टॅब आणि लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप असा ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चोरीतील रेडमी मोबाईल तसेच अन्य मुद्देमाल आणि इतर गुन्ह्यांबाबत पुढील तपास सुरू आहे.
दोन्ही आरोपींना ४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
तपास पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पथकाने केली.
या कारवाईत पोना रघुनाथ कारखेले, पोकॉ अंबादास वाघ, पोकों नवनाथ गुंजाळ, पोकॉ जयदिप गवारे, पोकॉ राम खारतोडे, पोकॉ रशिद शेख तसेच अपर पोलिस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर येथील पोहेकॉ सचिन धनाड यांनी सहभाग घेतला.
वृत्तवेध ऑनलाईन : पत्रकार राजेंद्र सालकर
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
