कोपरगाव : मतदारसंघातील ग्रामीण भागातील कमी दाबाचा वीजपुरवठा, वारंवार वीज खंडित होणे आणि ओव्हरलोड वीज रोहित्रांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी १ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली.
मतदारसंघातील अनेक गावांमध्ये वाढत्या विद्युतभारामुळे वीज रोहित्रांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी कमी दाबाने वीज मिळणे, तसेच ग्रामस्थांना वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. नवीन रोहित्र बसविणे आणि विद्यमान रोहित्रांची क्षमता वाढविण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.
कोणत्या गावांत कामे होणार?
मंजूर निधीतून सुरेगाव येथील कदम वस्ती डीपी व काटवन डीपी, कोपरगाव शहरातील खडकी येथील गवारे वस्ती डीपी, अंजनापूर गावठाण डीपी, कासली येथील गायकवाड वस्ती डीपी, नाटेगाव येथील बरड डीपी, खोपडी येथील बाळासाहेब वारकर डीपी, भोजडे येथील गाढवलोळी डीपी, कोकमठाण येथील गोरख लोहकणे डीपी, शहाजापूर येथील धायगुडे डीपी, डाऊच बु. येथील दहे डीपी, वाकडी येथील झोटिंग बाबा डीपी, पुणतांबा येथील चव्हाण वस्ती डीपी, सडे येथील पाणीपुरवठा योजना नवीन डीपी आणि हिंगणी येथील बढे डीपी या ठिकाणच्या ओव्हरलोड रोहित्रांची क्षमता वाढवून अधिक क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येणार आहेत.
पोहेगावात नवीन गावठाण डीपी
पोहेगाव येथे पिंपळादेवी मंदिर ते वत्सल मॉडेल स्कूल या परिसरासाठी नवीन गावठाण डीपी बसविण्यात येणार आहे. या कामात केबल आणि स्ट्रीट लाईट पोलचाही समावेश करण्यात आला आहे.
रोहित्रांची क्षमता वाढल्यानंतर वाढत्या विद्युतभाराचा प्रश्न कमी होण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी आणि ग्रामस्थांना घरगुती वापरासाठी अधिक सुरळीत वीजपुरवठा मिळण्याची अपेक्षा आहे. वीजपुरवठ्यातील अडथळे कमी झाल्याने संबंधित गावांमधील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
कोपरगाव, खडकी, सुरेगाव, अंजनापूर, कासली, नाटेगाव, खोपडी, भोजडे, कोकमठाण, शहाजापूर, डाऊच बु., वाकडी, पुणतांबा, सडे, हिंगणी आणि पोहेगाव परिसरातील नागरिकांना या कामांचा थेट फायदा होणार आहे.
वृत्तवेध ऑनलाईन : पत्रकार राजेंद्र सालकर
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
