आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश; प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार
कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील काकडी येथील श्री साईबाबा शिर्डी विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांनी विधिमंडळात उपस्थित केलेले प्रश्न आणि शासनदरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. महायुती शासनाने विमानतळाच्या विविध विकासकामांसाठी ३४ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे विमानतळावरील प्रलंबित विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार असून देश-विदेशातून येणाऱ्या साईभक्तांसह प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिर्डी हे देश-विदेशातील लाखो साईभक्तांचे श्रद्धास्थान असल्याने वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ असते. काकडी येथील शिर्डी विमानतळावरही प्रवाशांची संख्या वाढत आहे. या वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर आवश्यक पायाभूत सुविधा तसेच प्रवाशांना पूरक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
ही बाब लक्षात घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात विमानतळाच्या विकासासंदर्भात प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. तसेच विमानतळावरील विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
या पाठपुराव्याची शासनाने दखल घेत ३४ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याबरोबरच विमानतळाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्यास भविष्यात विमानसेवेला चालना मिळण्यास मदत होऊ शकते.
शिर्डी विमानतळाच्या विकासाचा सकारात्मक परिणाम काकडी, कोपरगाव आणि परिसरातील गावांच्या व्यापार, व्यवसाय तसेच आर्थिक उलाढालीवर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शिर्डीला भेट देणाऱ्या साईभक्तांना अधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि विमानतळाचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
