ऊसतोड कामगारांसोबत उसाच्या फडात साजरी केली दिवाळी; जलसंधारणासाठी २५ हजार कोटींच्या नियोजनाची माहिती
कोपरगाव : दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणे आवश्यक असून, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जलसंधारण विभागा़कडे सादर करण्यात आलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही मृद व जलसंधारणमंत्री ना. संजय राठोड यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिली.
राज्यात दिवाळीचा उत्साह सुरू असताना मंत्री संजय राठोड यांनी थेट उसाच्या फडात जाऊन ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी साजरी केली. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊसतोड कामगारांच्या तांड्यावर भेट देत त्यांनी शेकडो कामगारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या हस्ते कामगारांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला.
जलसंधारणाच्या कामांवर शासनाचा भर
दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, नाले खोलीकरण, पाणीपुरवठा प्रकल्पांमधील गाळ काढणे, पाणी साठवणुकीच्या नवीन व्यवस्था आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यावर शासनाचा भर राहणार असल्याचे मंत्री राठोड यांनी सांगितले.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत. पाणी अडविणे आणि जिरविण्यासोबतच पाणीपुरवठ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
जलसंधारण विभागाचे सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे नियोजन असून, केंद्र शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात मदत मिळणार असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघासाठी सादर केलेल्या जलसंधारणाच्या प्रस्तावांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
ऊसतोड कामगारांच्या आनंदात सहभागी
आमदार आशुतोष काळे म्हणाले, दिवाळीसारख्या सणाच्या काळात कुटुंबापासून दूर राहून ऊसतोड कामगार आपल्या कष्टातून साखर कारखानदारीला बळ देतात. अशा कामगारांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मंत्री राठोड यांनी थेट उसाच्या फडात जाऊन दिवाळी साजरी केली, ही कौतुकास्पद आणि संवेदनशील बाब आहे.
माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांनी सहकाराच्या माध्यमातून उभारलेल्या संस्थांची जपणूक करण्यात आली आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून उभारलेला प्रतिदिन ८०० मे. टन गाळप क्षमतेचा कारखाना आज ६ हजार मे. टन गाळप क्षमतेपर्यंत पोहोचला आहे. कारखान्याच्या प्रगतीसोबत कर्मचारी आणि ऊसतोड कामगारांच्या कल्याणाचीही काळजी घेतली जात असल्याचे काळे यांनी सांगितले.
साईबाबांच्या दर्शनापासून काळे कुटुंबाशी ऋणानुबंध
मंत्री संजय राठोड यांनी काळे कुटुंबाशी असलेल्या जुन्या संबंधांचाही उल्लेख केला. “मी साईबाबांचा भक्त असून १९९९ पासून नियमितपणे शिर्डीला दर्शनासाठी येत आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. आता आमदार आशुतोष काळे यांच्यासोबतही काम करण्याची संधी मिळत आहे. काळे कुटुंबाशी माझे जुने ऋणानुबंध आहेत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिनार कुदळे, संचालक सूर्यभान कोळपे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, ज्ञानेश्वर हाळनोर, सुनील कोळपे, अंबादास धनगर, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बी. बी. सय्यद, असिस्टंट सेक्रेटरी संदीप शिरसाठ यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, पदाधिकारी व ऊसतोड कामगार उपस्थित होते.
Byline:
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
