कोल्हापूरवर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ ने मात; १४ वर्षांखालील चौघांची मध्य प्रदेशात, तर १७ वर्षांखालील कृष्णा सातपुतेची झारखंडमध्ये निवड
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन :
बुलढाणा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने दमदार कामगिरी करीत राज्यविजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या संघावर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ अशी मात करीत गौतमच्या खेळाडूंनी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या राज्यविजेतेपदासोबतच शाळेच्या पाच खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राज्यातील आठ विभागांतील संघ सहभागी झालेल्या या स्पर्धेत गौतमच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ, अचूक नियोजन आणि सांघिक कौशल्याच्या जोरावर आपली छाप पाडली. उपांत्य फेरीत मुंबई विभागाच्या संघाचा पराभव करीत गौतमच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या संघाविरुद्ध दोन्ही संघांनी शेवटपर्यंत चुरशीचा खेळ केला. अखेर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर गेला. यामध्ये गौतमच्या खेळाडूंनी संयम आणि आत्मविश्वास राखत ४-३ अशी बाजी मारली आणि राज्यविजेतेपद मिळविले.
चार खेळाडूंची मध्य प्रदेशात राष्ट्रीय निवड
राज्यस्तरीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे १४ वर्षांखालील गटातील अभिषेक चौधरी, ओंकार डोंगरी, शहाजी घुमरे आणि रणवीर सिंग नागलोट यांची राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ८ ते १२ डिसेंबर २०२६ दरम्यान मंदसौर, मध्य प्रदेश येथे ही राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. मानव महाले याची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, १७ वर्षांखालील गटातून कृष्णा गणेश सातपुते याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान रांची, झारखंड येथे ही स्पर्धा होणार आहे.
ग्रामीण भागातील गुणवत्तेला क्रीडाव्यासपीठ
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्रीडा गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांना दर्जेदार सुविधा आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळावे, यासाठी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव चैतालीताई काळे सातत्याने प्रयत्नशील आहेत. खेळाडूंच्या सरावापासून स्पर्धांमधील सहभागापर्यंत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची संस्थेची भूमिका राहिली आहे.
संस्थेच्या पाठबळातून गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांत जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहेत. बुलढाणा येथील हॉकी स्पर्धेतील राज्यविजेतेपद आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडी हे त्याचेच फलित मानले जात आहे.
प्रशिक्षकांचे मार्गदर्शन ठरले महत्त्वाचे
या यशामागे शाळेचे शारीरिक शिक्षक तथा हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांना इसाक सय्यद, राजेंद्र आढाव आणि महेश गोंडे यांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकरावजी काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे, सचिव चैतालीताई काळे, सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, संस्था इन्स्पेक्टर नारायण बारे, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य तसेच प्राचार्य नूर शेख यांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.
चौकट : राष्ट्रीय मैदानावर गौतमचे लक्ष्य!
“ग्रामीण भागातील खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत विजेतेपद मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणे ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. खेळाडूंची जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना पाहता राष्ट्रीय स्पर्धेतही ते चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास आहे. मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करून खेळाडूंनी शाळेसह कोपरगाव तालुक्याचा नावलौकिक वाढवावा. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी संस्था सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील.”
— चैतालीताई काळे, सचिव, कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी
वृत्तवेध Byline :
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : पत्रकार राजेंद्र सालकर
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
