कोपरगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध प्रवास सवलत योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोपरगावातील गुरुद्वारा रोडवरील आमदार विवेक कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रीय सामाईक प्रवास (NCMC) कार्ड नोंदणी शिबिर सुरू असून, नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या कार्डाच्या माध्यमातून एसटी बस, मेट्रोसह विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी एकाच कार्डाचा वापर करता येणार असून, शासनाच्या प्रवास सवलत योजनांचाही लाभ मिळणार आहे.
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ६५ ते ७५ वयोगटाला ५० टक्के सवलत, महिलांना ‘महिला सन्मान’ योजनेअंतर्गत ५० टक्के सवलत, बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास तसेच विद्यार्थी, दिव्यांग आणि सैनिकांना नियमानुसार सवलती उपलब्ध आहेत.
शिबिर दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू आहे.
नोंदणीसाठी आधार कार्ड, त्यास जोडलेला मोबाईल क्रमांक आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी संबंधित ओळखपत्र आणणे आवश्यक असून, कार्डमध्ये किमान १०० रुपयांची शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. पात्र नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
