कोपरगाव | वृत्तवेध
नाशिक जिल्ह्यातील धरणक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केले असून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून होणारा पाण्याचा विसर्ग शुक्रवारी सकाळी ११ वाजता ९४ हजार ४९७ क्युसेक इतका वाढला आहे. नदी दुथडी भरून वाहत असल्याने कोपरगावसह नदीकाठच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सकाळी ६ वाजता ८२ हजार क्युसेक, सकाळी ८ वाजता ८८ हजार ९३५ क्युसेक आणि सकाळी ११ वाजता ९४ हजार ४९७ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. वाढत्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून नदीकाठच्या गावांमध्ये खबरदारीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, गंगापूर, कडवा, भावली, पालखेड, पुणेगाव, दारणा, गौतमी गोदावरी, वालदेवी आणि भाम या धरणांतूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीच्या खोऱ्यातील परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोपरगाव मतदारसंघातही गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार वादळी पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. काही भागांमध्ये जनजीवनावरही त्याचा परिणाम झाला असून महावितरणकडून दुरुस्तीची कामे सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. पूर पाहण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी नदीकाठावर जाण्याचा जीवघेणा मोह टाळावा, नदीपात्र, ओढे-नाले किंवा वेगवान पाण्याच्या प्रवाहात उतरू नये, तसेच लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनीही आपल्या पशुधनाला सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच कोसळलेले वीज खांब किंवा तुटलेल्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखावे. अशा घटना आढळल्यास तात्काळ महावितरण किंवा स्थानिक प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
पूरस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात, धोकादायक ठिकाणी सतत लक्ष ठेवावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदत पोहोचवावी, अशा स्पष्ट सूचना आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
महावितरणलाही कोसळलेले वीज खांब त्वरित दुरुस्त करून सुरक्षितपणे वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा आणि धरणांमधून वाढत असलेला विसर्ग लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सुरक्षिततेलाच सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
वृत्तवेध फोकस
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ९४,४९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग
गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली
कोपरगाव परिसरात पूरसदृश्य परिस्थिती
पूर पाहण्यासाठी नदीकाठावर जाणे टाळण्याचे आवाहन
वीज खांब कोसळल्याने काही भागात वीजपुरवठा विस्कळीत
प्रशासन व महावितरणला सतर्कतेच्या सूचना
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
