कोपरगाव | वृत्तवेध
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध विकासकामांना शासनाने मंजुरी दिली आहे.
जिल्ह्यासाठी २ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी कोपरगाव तालुक्यातील एक कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध विकासकामांचा समावेश आहे. या मंजुरीमुळे सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार असून, आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.
या मंजुरीमध्ये धामोरी येथे संविधान भवन उभारण्यासाठी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ३० टक्के म्हणजे ९ लाख रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे.
तसेच कोपरगाव नगरपरिषद हद्दीत संत रोहिदास भवनासाठी २५ लाख रुपये, जेऊर कुंभारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात संरक्षक भिंत व सुशोभीकरणासाठी १० लाख रुपये, कोळगावथडी येथे समाजमंदिरासाठी १५ लाख रुपये, काकडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरणासाठी १५ लाख रुपये तसेच करंजी येथे संत रविदास महाराज सभा मंडपासाठी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
याबाबत आमदार विवेक कोल्हे यांनी सांगितले की, समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक न्यायाची संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी महायुती सरकार सातत्याने विकासाभिमुख निर्णय घेत आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत शासनाने विकासाला प्राधान्य दिल्याचे त्यांनी नमूद केले.
या मंजुरीमुळे संबंधित गावांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, मंजूर झालेली सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचेही आमदार विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केले.
वृत्तवेध फोकस
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २.३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर
कोपरगाव तालुक्यात १ कोटीहून अधिक विकासकामांना मंजुरी
धामोरी येथे संविधान भवनासाठी ३० लाखांची तरतूद
संत रोहिदास भवन, समाजमंदिर, सभा मंडप आणि स्मारक सुशोभीकरणाचा समावेश
सामाजिक न्याय योजनेतून वंचित घटकांसाठी पायाभूत सुविधांना चालना
आपले मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.
ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी बातमी शेअर करा.अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
