कोपरगाव वृत्तवेध:
शहरातील मोकाट जनावरांचा वाढता वावर आता नागरिकांच्या जीवितासाठी गंभीर धोका ठरत आहे. रस्त्यांवर ठाण मांडून बसणारी जनावरे, अचानक वाहनांसमोर येणारे कळप आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे आतापर्यंत दोन नागरिकांना जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी सोमवारी (दि. १७) कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांच्यासमवेत बैठक घेतली.
यावेळी “अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार?” असा उद्विग्न सवाल करीत त्यांनी प्रशासनाला मोकाट जनावरांच्या प्रश्नावर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक ठिकाणी जनावरे रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावा लागतो. कळप अचानक रस्त्यावर आल्याने अपघाताचा धोका वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दोन बळी गेले; आता तरी प्रशासन जागे होणार का?
मोकाट जनावरांचा प्रश्न केवळ वाहतुकीतील अडथळ्याचा नसून तो थेट नागरिकांच्या जीविताशी संबंधित असल्याचे आमदार काळे यांनी स्पष्ट केले. दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा दुर्घटना घडू नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाने आधीच प्रभावी पावले उचलली पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष द्या
मोकाट जनावरांचा बंदोबस्त काही दिवसांच्या कारवाईपुरता मर्यादित न ठेवता त्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याच्या सूचना आमदार काळे यांनी दिल्या. प्रमुख रस्ते, बाजारपेठा, चौक तसेच शैक्षणिक परिसरात विशेष लक्ष देऊन मोकाट जनावरे पकडावीत आणि ती पुन्हा रस्त्यावर येणार नाहीत, याची प्रभावी व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले.
नुसती बैठक नको; आता प्रत्यक्ष कारवाई हवी!
मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असताना केवळ बैठका आणि आश्वासनांवर प्रश्न सुटणार नाही. जनावरे पकडण्याबरोबरच ती मोकाट सोडणाऱ्या पशुमालकांची जबाबदारी निश्चित करून नियमांची कठोर अंमलबजावणी करणेही गरजेचे आहे. अन्यथा नगरपरिषद जनावरे पकडत राहणार आणि मालक ती पुन्हा रस्त्यावर सोडत राहणार, हे दुष्टचक्र कायम राहण्याची शक्यता आहे.
नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन मोकाट जनावरांचा प्रश्न तातडीने निकाली काढा, अशा स्पष्ट सूचना आमदार आशुतोष काळे यांनी मुख्याधिकारी अजित निकत यांना दिल्या.
आपले मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.
ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी बातमी शेअर करा.अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
