कोपरगाव वृत्तवेध:
स्वातंत्र्य हा केवळ उत्सवाचा विषय नसून तो असंख्य स्वातंत्र्यवीरांच्या त्याग, बलिदान आणि राष्ट्रभक्तीची देणगी आहे. त्यामुळे संविधानातील मूल्यांचे जतन करून राष्ट्राची एकता व अखंडता अबाधित ठेवण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन के. जे. सोमैया (वरिष्ठ) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी केले.
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेश ठोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीपराव रोहमारे, सुरेश शिंदे, प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘संविधान देशाला एका धाग्यात बांधणारे शक्तिस्थान’
प्राचार्य डॉ. ठाणगे यांनी स्वागतपर मनोगतात स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करताना भारतासारख्या सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण देशाला राज्यघटनेने एका धाग्यात बांधले आहे, असे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून, प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे राजेश ठोळे यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना अभिवादन केले. तरुण पिढीने देशाप्रती समर्पणाची भावना ठेवून आपले कर्तव्य बजावले, तर भारत महासत्ता होण्यापासून दूर नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एनसीसी छात्र सैनिकांचा गौरव
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय छात्र सेना विभागातील छात्र सैनिकांचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यानंतर सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित देशभक्तीपर कार्यक्रमात वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते तसेच विविध कलागुण सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एनसीसी विभागाचे प्रमुख कॅप्टन डॉ. नितीन शिंदे, लेफ्टनंट सौ. वर्षा आहेर, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र बनसोडे, क्रीडा विभागप्रमुख डॉ. सुनील कुटे व प्रा. मिलिंद कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपले मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.
ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी बातमी शेअर करा.अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
