शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साईबाबा संस्थानने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्हीआयपी भाविकांसाठी उपलब्ध असलेल्या ब्रेक (प्रोटोकॉल) दर्शनाच्या शुल्कात १०० रुपयांची वाढ करण्यात आली असून ९ जुलैपासून प्रति व्यक्ती ३०० रुपये शुल्क आकारले जात आहे. यापूर्वी या सुविधेसाठी २०० रुपये शुल्क होते.
साईबाबा संस्थानतर्फे सकाळी ९ ते १०, दुपारी २.३० ते ३.३० आणि रात्री ८ ते ८.३० या तीन वेळांमध्ये जनसंपर्क कार्यालयामार्फत ब्रेक दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. दुसरीकडे, सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन लाईन कॉम्प्लेक्समधील गेट क्रमांक ६ व ७ मधून २०० रुपयांत सशुल्क झटपट दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे.
मात्र, सशुल्क दर्शन घेणाऱ्या भाविकांची रांग पुढे जाऊन मुख्य रांगेत मिसळत असल्याने पैसे भरूनही अपेक्षित वेगाने दर्शन होत नसल्याची तक्रार अनेक भाविकांकडून होत होती. त्याचवेळी समान शुल्क भरून प्रोटोकॉलधारकांना थेट व्हीआयपी सुविधा मिळत असल्याने सामान्य भाविकांमध्ये नाराजी होती. ही तफावत दूर करण्यासाठीच ब्रेक दर्शनाच्या शुल्कात वाढ करण्यात आल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
संस्थानच्या माहितीनुसार, सशुल्क दर्शन आणि आरती घेणाऱ्या भाविकांच्या तुलनेत ब्रेक दर्शन घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ सुमारे ५.२५ टक्के आहे. तर मंदिरात येणाऱ्या एकूण भाविकांच्या तुलनेत हे प्रमाण अर्धा ते पाऊण टक्का इतकेच आहे.
शुल्कवाढीसोबतच ब्रेक दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी काही सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. सामान्य दर्शन रांगेप्रमाणेच ब्रेक दर्शनाच्या वेटिंग हॉलमध्ये चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच समाधी दर्शनस्थळी अर्धी काच बसविण्यात आल्याने भाविकांना साईबाबांच्या पादुकांना हस्तस्पर्श करून दर्शन घेण्याची संधी मिळत आहे.
दरम्यान, २०० रुपये भरून सशुल्क दर्शन घेणाऱ्या सामान्य भाविकांना अजूनही अपेक्षित झटपट दर्शन मिळत नसल्याने या व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी होत आहे. या भाविकांसाठी किमान नंदी मूर्तीपर्यंत स्वतंत्र रांग उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून पैसे भरूनही होणारा मनस्ताप कमी होईल आणि अधिक भाविक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संस्थानच्या निर्णयाचे अनेक भाविकांनी स्वागत केले असून काही भाविकांनी ब्रेक (प्रोटोकॉल) दर्शनाचे शुल्क थेट ५०० रुपये करण्याचीही मागणी केली आहे. त्यामुळे व्हीआयपी दर्शनाचा गैरवापर कमी होईल आणि सर्वसामान्य भाविकांनाही अधिक न्याय मिळेल, असे त्यांचे मत आहे.
वर्षभरात ब्रेक दर्शनातून ३.१७ कोटींचे उत्पन्न
२२ जून २०२५ ते ३० जून २०२६ या कालावधीत १ लाख ५८ हजार ५९६ भाविकांनी ब्रेक दर्शनाचा लाभ घेतला. या सुविधेतून साईबाबा संस्थानला ३ कोटी १७ लाख १९ हजार रुपये उत्पन्न मिळाले. याच कालावधीत सुमारे ३० लाख भाविकांनी सशुल्क दर्शन आणि आरती योजनेचा लाभ घेतला.
