‘आकृती २०२६’मध्ये २,४४३ टीम्सवर मात; कानात औषधी थेंब टाकण्यासाठी विकसित केलेल्या ॲप्लिकेटरला प्रथम क्रमांक
कोपरगाव : कोपरगावच्या विद्यार्थिनी राजहंस मंदार आढाव हिने राष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाची ठळक नोंद केली आहे. डसॉल्ट सिस्टीम्सतर्फे आयोजित विद्यार्थी नाविन्य स्पर्धा ‘आकृती २०२६’मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, विजयवाडा येथील ‘टीम कारीगर’ने प्रथम क्रमांक पटकावला. या टीममध्ये राजहंसचा समावेश असून, तिच्या नाविन्यपूर्ण कल्पकतेने कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
२,४४३ टीम्स, १७ हजारांहून अधिक विद्यार्थी; कोपरगावची राजहंस अव्वल!
स्पर्धेच्या १६व्या वर्षी देशभरातून तब्बल २,४४३ टीम्स आणि १७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मोठ्या स्पर्धेत राजहंस आणि तिच्या सहकाऱ्यांनी कानात औषधी थेंब टाकण्यासाठी सुलभ ॲप्लिकेटर विकसित केला. या प्रकल्पाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
आता अमेरिकेत भारताचे प्रतिनिधित्व

राष्ट्रीय स्पर्धेतील या विजयामुळे ‘टीम कारीगर’ला आता थेट आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये अमेरिकेतील नॅशव्हिल येथे होणाऱ्या ‘३डी एक्सपीरियन्स वर्ल्ड’ ग्लोबल फिनालेमध्ये ही टीम भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत तब्बल ३५ देशांतील संघ सहभागी होणार आहेत.
कोपरगावच्या समता स्कूलची माजी विद्यार्थिनी
राजहंस आढाव ही कोपरगावच्या समता इंटरनॅशनल स्कूलची माजी विद्यार्थिनी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिला विजयवाडा येथील संस्थेत प्रवेश मिळाला. सध्या ती तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे.
राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या या प्रकल्पाचे पेटंट नोंदविण्याचा राजहंस आणि तिच्या टीमचा मानस आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाच्या आधारे स्वतःची कंपनी उभारण्याची इच्छाही राजहंसने व्यक्त केली आहे.
आढाव कुटुंबाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
राजहंस ही प्रसिद्ध विधिज्ञ कै. शंकरमामा आढाव आणि प्रयोगशील ज्येष्ठ शेतकरी रंजनाताई आढाव यांची नात आहे. तिच्या राष्ट्रीय स्तरावरील यशामुळे कोपरगावसह अहिल्यानगर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वृत्तवेध फार्मुला Byline: कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
