कोपरगाव : राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामातील कथित गंभीर त्रुटींमुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना दरवर्षी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा आमदार आशुतोष काळे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात उपस्थित केला.
पावसाळ्यात अंडरपासमध्ये साचणारे पाणी, भरावासाठी करण्यात आलेल्या उत्खननामुळे खचणाऱ्या सुपीक जमिनी आणि शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय झालेल्या खोदकामाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
आमदार काळे यांनी सांगितले की, कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची लांबी २९.३९६ किलोमीटर असून स्थानिक दळणवळणासाठी २४ लहान-मोठे अंडरपास उभारण्यात आले आहेत. मात्र तालुक्यात भरावासाठी आवश्यक माती उपलब्ध नसल्याने ठेकेदाराने मुख्य भरावाची उंची कमी करून अंडरपासची खोली तब्बल दोन ते अडीच फूट वाढविल्याचा आरोप त्यांनी केला.
यामुळे प्रत्येक पावसाळ्यात अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. अनेक दिवस पाणी न ओसरल्याने हे मार्ग पूर्णपणे बंद पडतात. परिणामी शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांचे दैनंदिन दळणवळण विस्कळीत होते. गेली चार-पाच वर्षे याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही संबंधित अधिकारी केवळ उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
भरावासाठी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आले, त्या परिसरातील शेजारच्या सुपीक जमिनी खचू लागल्याचा मुद्दाही त्यांनी सभागृहात मांडला. विशेष म्हणजे, उत्खननासाठी जमीन देण्यास नकार दिलेल्या काही शेतकऱ्यांच्या जमिनीतही परवानगीशिवाय खोदकाम झाल्याचे मोजणीतून स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणाची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय व योग्य भरपाई मिळावी, अशी ठाम मागणी आमदार काळे यांनी केली.
समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाचे प्रतीक मानला जात असला, तरी विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे नुकसान आणि नागरिकांच्या दळणवळणावर परिणाम होत असेल, तर संबंधित त्रुटी तातडीने दूर करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी सभागृहात व्यक्त केले.
