कोपरगाव : महिलांनी आपल्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्कांची माहिती करून घेत कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवला पाहिजे, असे प्रतिपादन ॲड. राजश्री शिंदे यांनी केले.
स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि अंतर्गत महिला तक्रार निवारण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महिलांचे कायदेशीर हक्क आणि सुरक्षितता’ या विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. विजय ठाणगे होते.
ॲड. शिंदे यांनी महिलांचे घटनात्मक व कायदेशीर हक्क, कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा (POSH), सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, महिला हेल्पलाइन तसेच अन्याय झाल्यास उपलब्ध कायदेशीर उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थिनींनी कायद्याची माहिती ठेवून आत्मविश्वासाने आपल्या हक्कांसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अंतर्गत महिला तक्रार निवारण कक्षाच्या प्रमुख डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी विद्यार्थिनींमध्ये कायदेशीर साक्षरता, सुरक्षिततेची जाणीव आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रा. सायली भावसार यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. वर्षा आहेर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. नीता शिंदे, प्रा. खंडीझोड, प्रा. वहाडणे, प्रा. वाकचौरे, प्रा. हर्षदा गवळी, प्रा. कर्डिले आणि प्रा. घुगे यांचे सहकार्य लाभले.
