कोपरगाव : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकाच्या लोकार्पणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला अखेर यश आले आहे.
नगराध्यक्ष पराग संधान यांनी उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर स्मारकाचे लोकार्पण नगरपरिषदेच्या माध्यमातून शासकीय पद्धतीने करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर समाजबांधवांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.
नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासमवेत राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे, राजेंद्र बागुल, विजय वाजे, प्रशांत कडू, आकाश वाजे, कैलास मंजुळ, फिरोज पठाण, दत्तू पगारे, सोमनाथ म्हस्के, रोहित कनगरे, उमेश धुमाळ, सतीश रानोडे, जयवंत मरसाळे, विक्रांत सोनवणे, सिद्धांत सोनवणे, रवींद्र सानप, रवींद्र शेलार, रोहिदास पाखरे, फकीरमहमद पहिलवान, इरफान कुरेशी, शंकर बिराडे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी आंदोलकांच्या सर्व मागण्या ऐकून घेत नगरपरिषद त्याबाबत सकारात्मक आणि कृतिशील भूमिका घेत असल्याचे संधान यांनी स्पष्ट केले.
यावेळी ‘साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह’ हे नाव कायम राहणार असल्याची स्पष्ट ग्वाहीही देण्यात आली. नाट्यगृहाच्या जागेचा करार संपुष्टात आल्यानंतर २०२४ पासून कार्यवाही रखडली होती.
मात्र मार्च २०२६ पासून नव्या पदाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेला गती दिली असून जिल्हाधिकारी स्तरावरील पुढील कार्यवाही सुरू असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनीही हा प्रश्न शासन स्तरावर मार्गी लागावा, यासाठी पाठपुरावा केल्याची माहिती त्यांनी दिली.
नगरपरिषदेने लोकार्पणाबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याने समाजबांधवांनी नगराध्यक्षांच्या भूमिकेवर विश्वास व्यक्त करत आंदोलन मागे घेतले. संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून समाजहिताचे प्रश्न सोडविण्याची नगरपरिषदेची भूमिका कायम राहील, असेही संधान यांनी नमूद केले.
◼️ उपोषणकर्ते कोण होते?
पूर्णाकृती स्मारकाच्या लोकार्पणासाठी अर्जुन मरसाळे, नितीन साबळे, फकीरा चंदनशिव, रवींद्र डोलारे आणि शरद त्रिभुवन यांनी उपोषण सुरू केले होते. मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर त्यांनी अधिकृतपणे उपोषण स्थगित केले.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
