कोपरगाव वृत्तवेध:
कोपरगाव : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त होत असतानाच कोपरगाव आणि निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवरील आठ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या विशेष दुरुस्तीसाठी राज्य शासनाने ७ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असून, त्यामुळे हजारो हेक्टर शेतीचे सिंचन, भूजल पुनर्भरण आणि नागरिकांच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्य बातमी :
संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोदावरी नदीवरील हिंगणी, माहेगाव देशमुख, डाऊच, सडे, शिंगवे, पुणतांबा, वडगाव कानळद तसेच निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या विशेष दुरुस्तीला हिरवा कंदील देत ७.१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या बंधाऱ्यांवरील लोखंडी प्लेट्स जीर्ण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत होती. परिणामी पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होऊन सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत विशेष प्रस्ताव सादर केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने निधी मंजूर केला आहे.
बंधाऱानिहाय मंजूर निधी :
हिंगणी – १ कोटी १० लाख रुपये
माहेगाव देशमुख – १ कोटी ४० लाख रुपये
डाऊच – ९० लाख रुपये
सडे – ३४ लाख रुपये
शिंगवे – ४५ लाख रुपये
पुणतांबा – ५० लाख रुपये
वडगाव कानळद – १ कोटी २० लाख रुपये
खेडलेझुंगे – १ कोटी ४० लाख रुपये
या निधीतून संरक्षण रेलिंगची दुरुस्ती, नवीन लोखंडी प्लेट्स बसविणे, जोडरस्त्यांची दुरुस्ती आणि इतर तातडीची कामे हाती घेतली जाणार आहेत. तातडीची कामे १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत, तर मोठ्या स्वरूपाची सर्व कामे ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कामे पूर्ण झाल्यानंतर बंधाऱ्यांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी साठविता येणार असून त्याचा थेट फायदा हजारो हेक्टर शेती, भूजल पातळी आणि नागरिकांच्या पाणीपुरवठ्याला होणार आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
निधी मंजूर झाल्यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
बंधाऱ्यांच्या विशेष दुरुस्तीमुळे पाण्याची गळती थांबून अधिकाधिक पाणी अडविणे शक्य होणार असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
वृत्तवेध विश्लेषण :
एल निनोमुळे संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन शासनाने वेळेत घेतलेला हा निर्णय कोपरगाव व निफाड परिसरासाठी दिलासादायक ठरणार आहे. बंधाऱ्यांची दुरुस्ती पूर्ण झाल्यास गोदावरीचे पाणी अधिक काळ अडवून शेती, पिण्याचे पाणी आणि भूजल पुनर्भरणाला मोठी चालना मिळणार आहे.
