चार तलावांचा गाळ काढणार; १९ कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावणार, १० लाखांपर्यंत वैद्यकीय विमा
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर :
शहराच्या पाणीप्रश्नासह जलसंधारण, स्वच्छता, कर्मचारी कल्याण, जुन्या नोंदींचे डिजिटलायझेशन आणि नागरी सुविधांना गती देणारे महत्त्वपूर्ण निर्णय कोपरगाव नगरपरिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आले. नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) झालेल्या सभेत तलावांचा गाळ काढण्यापासून कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्यापर्यंत विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले.
चार तलावांचा गाळ काढणार; पाणी पुनर्वापरालाही चालना
शहराच्या पाणी नियोजनाला प्राधान्य देत तलाव क्रमांक १ ते ४ मधील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. जलशुद्धीकरण केंद्रात रिसायकलिंग टँक उपलब्ध करून पाण्याचा पुनर्वापर वाढविण्यात येणार आहे. तलाव क्रमांक १, २, ४ व ५ येथील लोखंडी इनलेट जाळ्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
गोदावरी नदीपात्रातील दत्तपार परिसरातील विहिरीचे पुनर्जीवन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच खंदक नाल्याचे संरक्षण व विकासकामांसाठी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
१९ कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावणार
नगरपालिकेतील निवृत्त झालेल्या १८ कर्मचाऱ्यांच्या आणि लवकरच निवृत्त होणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी १० लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याची कार्यवाहीही करण्यात येणार आहे.
४०-५० वर्षांच्या जन्म-मृत्यू नोंदी एआयच्या मदतीने डिजिटल
नगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या ४० ते ५० वर्षांपूर्वीच्या जन्म-मृत्यू नोंदींचे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या नोंदींचे जतन होण्यासह नागरिकांना आवश्यक नोंदी मिळविणे सुलभ होणार आहे.
मायनेट प्रणालीचे आधुनिकीकरण करून उपलब्ध माहिती आयडब्ल्यूबीपी पोर्टलवर स्थलांतरित करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
घनकचरा व्यवस्थापनासाठी १५ ते १७ मोठी वाहने
घनकचरा संकलन व वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून १५ ते १७ मोठ्या आकाराची वाहने खरेदी करण्यात आली आहेत. मनाई येथील घनकचरा डेपोचा विकास करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि इतर नागरी सुविधांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येणार आहे.
तीन ठिकाणी व्हेज फूड कोर्ट
शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तीन ठिकाणी व्हेज फूड कोर्ट विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वामी समर्थ मंदिर परिसरातील भिंतीचे बांधकाम व सुशोभीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
१५ प्रभागांत स्टोरेज कॅबिन; रस्त्यांसाठी सुधारित अंदाजपत्रक
स्वच्छता विभागाचे काम अधिक परिणामकारक करण्यासाठी शहरातील सर्व १५ प्रभागांत स्टोरेज कॅबिन उभारण्यात येणार आहेत. प्रभाग क्रमांक ९ मधील विविध रस्त्यांच्या कामांसाठी सुधारित अंदाजपत्रके तयार करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
वर्षपूर्तीनंतर आश्वासनांच्या पूर्ततेचा दावा
नगरपरिषदेच्या सत्तेला वर्षपूर्ती होत असताना नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने प्रशासनाची वाटचाल सुरू असल्याचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले. आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, कर्मचारी कल्याण आणि नागरी सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले.
सभेस मुख्याधिकारी अजित निकत यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, गटनेते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वृत्तवेध फार्मुला
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
