‘आम्ही गिनीपिग नाही!’; सावळीविहीर–नगर महामार्गाच्या निकृष्ट कामावर संजय काळेंचा संताप

कोपरगाव वृत्तवेध :

सावळीविहीर फाटा ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160च्या कामाच्या दर्जावर सामाजिक कार्यकर्ते संजय बबुताई भास्कराव काळे यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “आम्ही भारतीय गिनीपिग नाही; रस्त्याच्या कामाच्या नावाखाली आमच्यावर प्रयोग करू नका!” असा संतप्त सवाल करत त्यांनी NHAIकडे रस्त्याचे तातडीने IIT, NIT किंवा BHUमधील तज्ज्ञांकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी केली आहे.


NHAIच्या पत्रात ठेकेदाराने ५० टक्के काम पूर्ण केल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र काळे यांच्या म्हणण्यानुसार, या कामातील मोठा हिस्सा मागील दोन ठेकेदारांच्या कार्यकाळातील आहे. त्यामुळे सध्याच्या ठेकेदाराने नेमके किती काम केले, किती निधी खर्च केला आणि त्या कामाचा दर्जा काय? याचा हिशेब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.


दहा वर्षांचा DLP असेल तर खड्डे बुजविण्याची नवी निविदा कशासाठी?
NHAIकडूनच रस्त्याच्या कामासाठी 10 वर्षांचा दोष दायित्व कालावधी (DLP) असल्याचे सांगण्यात आले आहे. या कालावधीत रस्त्यावर निर्माण होणारे दोष व खड्डे दुरुस्त करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असल्याचेही नमूद आहे.


मग रस्त्याचे काम सुरू असतानाच खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र निविदा काढण्याची वेळ का येते? दहा वर्षांची हमी प्रत्यक्षात कोण देणार? ठेकेदाराकडून घेतलेली बँक हमी किती आहे? असे थेट प्रश्न काळे यांनी उपस्थित केले आहेत.


‘ब्रिटिशांचा रस्ता टिकला, स्वातंत्र्यानंतरचा दोन वर्षेही का नाही?’
रस्त्याच्या गुणवत्तेवर भाष्य करताना काळे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच सवाल केला आहे. “ब्रिटिशांनी केलेले रस्ते दीर्घकाळ टिकले; मग स्वातंत्र्यानंतरचे डांबरी रस्ते दोन वर्षेही का टिकत नाहीत? BOT पद्धतीच्या रस्त्यांवर दहा वर्षे खड्डे पडत नाहीत, मग येथेच अशी परिस्थिती का?” असा सवाल त्यांनी केला आहे.


“आम्ही भारतीय गिनीपिग नाही. आम्हाला प्रयोग नकोत; आम्हाला टिकाऊ, सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता हवा!” असा रोखठोक संदेश देत संजय काळे यांनी NHAIसमोर आव्हान उभे केले आहे.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या