कोपरगाव | वृत्तवेध : राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संघटन विस्ताराला वेग देत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता (शिर्डी) आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक फेररचना करण्यात आली असून, कोपरगावात नव्या नेतृत्वावर पक्षबांधणीची धुरा सोपविण्यात आली आहे.
कोणाला मिळाली कोणती जबाबदारी?
जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांनुसार प्रमोद लबडे यांची तालुका सहसंपर्कप्रमुख, भरत मोरे (पूर्व), श्रीरंग चांदगुडे (पश्चिम) आणि राजू शेख (पुणतांबा परिसर) यांची तालुकाप्रमुख, संजय दंडवते (ग्रामीण) व अस्लम शेख (शहर) यांची उपजिल्हाप्रमुख, बाळासाहेब जाधव यांची विधानसभाप्रमुख, तर मुन्नाभाई मन्सुरी यांची विधानसभा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वरिष्ठ नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
नव्या पदाधिकाऱ्यांचे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख सचिन कोते जिल्हा प्रमुख जगदीश चौधरी आणि कोपरगाव शहरप्रमुख गगन हाडा यांनी अभिनंदन करून आगामी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ऑपरेशन टायगरनंतर संघटना विस्ताराला गती
लोकसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्यभर संघटन मजबूत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. पक्षाला धक्का बसलेल्या मतदारसंघांमध्ये नव्याने संघटन उभारणीवर भर दिला जात असून, त्याचाच भाग म्हणून नुकताच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा दौरा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.
त्यानंतर लगेचच कोपरगावसह विविध मतदारसंघांतील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेने संघटनात्मक तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे.
पक्षश्रेष्ठींचा स्पष्ट संदेश
नियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढ, जनसंपर्क आणि संघटन विस्तारासाठी सक्रियपणे काम करावे, असा संदेश पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आला आहे. या नियुक्त्यांमुळे कोपरगावातील ठाकरे सेनेच्या राजकीय हालचालींना नवी दिशा मिळणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
