कोपरगाव : शहरातील नागरी सुविधांना बळकटी देण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेला ८८ लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत ७८ लाख रुपये, तर रस्ता विकासासाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमदार विवेक कोल्हे यांच्या प्रयत्नातून आणि नगराध्यक्ष पराग संधान यांनी सुचविलेल्या विकासकामांसाठी हा निधी उपलब्ध झाला आहे.
चार ठिकाणी विरंगुळा केंद्रे
मंजूर निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरातील चार ठिकाणी नगरपरिषदेची विरंगुळा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. अंबिका नगर साईधाम, हनुमान नगर-माऊली आनंदालयाजवळील इंगळे नगर, साई सिटी-रचना नक्षत्रसमोर येवला रोड आणि सह्याद्री कॉलनी येथे प्रत्येकी १२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
तीन मंदिरांमध्ये सभामंडप
गणपती मंदिर, न्याती मंदिर आणि मेसाई मंदिर बाजारतळ येथे सभामंडप उभारण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या सुविधांचा सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपयोग होणार आहे.
रस्त्यासाठीही १० लाख
मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रकमांमधून रस्ता अनुदान योजनेंतर्गत जुने कब्रस्तान ते लाहोटी महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता विकसित करण्यासाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याची जागा, नागरिकांसाठी सभामंडप आणि दळणवळणासाठी रस्ता अशी विविध कामे मार्गी लागणार आहेत.
निधी मंजूर केल्याबद्दल नगराध्यक्ष पराग संधान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य शासन आणि आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचे आभार मानले. शहरातील प्रत्येक भागातील मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देऊन विकासकामे सुरू ठेवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
वृत्तवेध फार्मुला
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
