कोपरगावात वाढत्या गुन्हेगारीवर आमदार आशुतोष काळे आक्रमक;

कोपरगाव | वृत्तवेध प्रतिनिधी : कोपरगाव शहरात चेन स्नॅचिंग, बंद घरफोड्या, चोरी आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी शहर व ग्रामीण पोलीस प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक घेत कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी कठोर भूमिका घेतली. “गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करा आणि नागरिकांना सुरक्षिततेची खात्री द्या,” असा स्पष्ट संदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिला.

शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, बसस्थानक परिसर आणि संवेदनशील भागांमध्ये नियमित पोलीस गस्त वाढविणे, रात्री विशेष गस्त पथके तैनात करणे, संशयित व्यक्तींवर करडी नजर ठेवणे तसेच सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी निगराणी ठेवून गुन्हेगारांना तातडीने जेरबंद करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविणे, नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देणे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

“कोपरगाव शहर आणि तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाली तरच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होईल,” असे आमदार आशुतोष काळे यांनी स्पष्ट केले.

बैठकीस शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, ग्रामीण पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी सुरू असलेल्या गुन्हे प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला असून, आगामी काळात गस्त वाढविणे, तपासाची गती वाढविणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हे उघडकीस आणण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

गेल्या काही दिवसांत चेन स्नॅचिंग, घरफोड्या आणि चोरीच्या घटनांनी कोपरगावकरांची चिंता वाढवली आहे. बैठका आणि सूचना यापलीकडे जाऊन प्रत्यक्षात गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारी कारवाई होते का, वाढत्या गुन्हेगारीला लगाम लागतो का आणि नागरिकांना सुरक्षिततेची खरी हमी मिळते का, याकडे आता संपूर्ण कोपरगावचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या