कोपरगाव | वृत्तवेध न्यूज
कोपरगाव तालुक्यातील कार्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्य शासनाच्या मान्यतेने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.
आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे इन्स्पेक्टर नारायण बारे यांच्या हस्ते या सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी, परिसरातील शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांना विविध शासकीय सेवा आता स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.
दरवर्षी प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती अर्ज, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन-क्रिमीलेयर आदी कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा खासगी सेतू केंद्रांवर जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अतिरिक्त खर्च होत होता. ही अडचण लक्षात घेऊन संस्थेच्या सचिव सौ. चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय प्रशासनाने राज्य शासनाकडे सेवा केंद्र मंजुरीचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर हे केंद्र कार्यान्वित झाले आहे.
या सेवा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले, शिष्यवृत्ती अर्ज, स्पर्धा परीक्षा अर्ज, विविध ऑनलाइन अर्जांची सुविधा मिळणार आहे. तसेच नागरिकांना आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी आवश्यक ऑनलाइन सेवा आणि अर्ज प्रक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. शेतकरी बांधवांनाही विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता याच केंद्रातून करता येणार आहे.
महाविद्यालयातच सेवा केंद्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांसाठी खासगी केंद्रांवर अवलंबून राहावे लागणार नाही. महाविद्यालयीन वेळेतच सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून नागरिकांचीही मोठी गैरसोय दूर होणार आहे.
या सेवा केंद्राचा परिसरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे इन्स्पेक्टर नारायण बारे यांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. विजया गुरसळ, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे प्राचार्य वसीम शेख तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व कर्मचारी उपस्थित होते.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
