AIच्या युगात साखर कामगारांनी बदललेच पाहिजे!; आधुनिक प्रशिक्षणाशिवाय उद्योगाचे भविष्य धोक्यात – आ. आशुतोष काळे

शिर्डी | वृत्तवेध न्यूज : साखर उद्योगात आता तंत्रज्ञानाची क्रांती झाली असून स्वयंचलित यंत्रणा, डिजिटल प्रक्रिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या वापरामुळे कारखान्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. अशा परिस्थितीत साखर कामगारांनीही जुन्या कार्यपद्धतीत अडकून न राहता आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून कौशल्यवृद्धी करणे ही काळाची अपरिहार्यता आहे. भविष्यातील आव्हानांचा यशस्वी सामना करायचा असेल, कारखान्यांची उत्पादकता वाढवायची असेल आणि कामगारांचे आर्थिक भविष्य अधिक सक्षम करायचे असेल, तर आधुनिक प्रशिक्षणाला पर्याय नाही, असे ठाम प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने शिर्डी येथे आयोजित राज्यस्तरीय साखर कामगार मार्गदर्शन शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

आ. काळे म्हणाले की, साखर उद्योग हा ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून हजारो कामगारांच्या कुटुंबाचा आणि लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनाचा आधार आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला आणि कामगारांच्या श्रमाला न्याय मिळाला, तरच साखर उद्योग अधिक मजबूत होईल.

भविष्यातील तांत्रिक बदल स्वीकारून आधुनिक प्रशिक्षण घेणारा कामगारच उद्याच्या साखर उद्योगात सक्षमपणे उभा राहू शकतो. उत्पादकता वाढली तर शेतकऱ्यांना अधिक मोबदला आणि कामगारांना अधिक चांगले वेतन देणे शक्य होईल. त्यामुळे प्रत्येक कामगाराने बदलत्या काळाशी स्पर्धा करत नवे कौशल्य आत्मसात करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

अजितदादांच्या मार्गदर्शनाची आठवण

कृषी, सहकार आणि साखर उद्योगाची दिवंगत अजितदादांना सखोल जाण होती. साखर कामगारांच्या वेतनासंदर्भातील त्रिपक्षीय समितीला त्यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन उद्योगासाठी मोलाचे ठरले. त्यामुळे अशा चर्चांमध्ये त्यांची आठवण अपरिहार्यपणे येते, असे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब मोटे, छत्रपती सहकारी साखर कारखाना (इंदापूर)चे व्हाइस चेअरमन शिवाजीराव निंबाळकर, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस रावसाहेबजी पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय निमसे, अशोकराव पवार तसेच राज्यभरातील साखर कामगार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या