कोपरगाव | वृत्तवेध
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना आणखी गती देण्याच्या दिशेने आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. महायुती शासनाने मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी सुमारे ₹१ कोटी ३० लाखांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या असून, यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या कामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामीण व नागरी भागातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी रस्ते, सार्वजनिक सुविधा, सामाजिक व धार्मिक स्थळांचा विकास तसेच सांस्कृतिक पायाभूत सुविधा उभारण्यावर आमदार काळे यांनी सातत्याने भर दिला होता. शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर माहेगाव देशमुख, कोळगाव थडी, वेस, चितळी आणि रवंदे या गावांतील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला असून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
या कामांसाठी प्रसिद्ध झाल्या निविदा
माहेगाव देशमुख : ६ चारी रस्ता ते भिकनभाई सय्यद वस्ती रस्ता मजबुतीकरण – ₹४० लाख
कोळगाव थडी : ग्रामीण मार्ग क्र.२९ ते इब्राहिम शेख वस्ती रस्ता काँक्रीटीकरण – ₹३५ लाख
वेस : मुस्लिम मोहल्ल्यात सांस्कृतिक सभागृह – ₹२० लाख
चितळी : कब्रस्तान संरक्षक भिंत – ₹२० लाख
रवंदे : कब्रस्तान सुशोभीकरण व सी.डी. वर्क – ₹१५.५० लाख
निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे संबंधित विकासकामांना लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार असून दर्जेदार रस्ते, सुरक्षित सार्वजनिक सुविधा आणि आवश्यक सामाजिक पायाभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे संबंधित गावांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याचे स्वागत केले आहे.
‘प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय’
“कोपरगाव मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विकासकामांसाठी निधी आणण्याची प्रक्रिया यापुढेही अधिक वेगाने आणि निरंतर सुरू राहील.” — आमदार आशुतोष काळे
