कोपरगाव : आकाशात उडणारे विमान पहिल्यांदाच अगदी जवळून पाहण्याची उत्सुकता… धावपट्टीवर विमान उतरताना पाहण्याचा रोमांच… विमानतळाची सुरक्षा, तांत्रिक यंत्रणा आणि कामकाज समजून घेण्याची संधी… आणि परतीच्या प्रवासात मनात आकाराला आलेले नवे स्वप्न—‘पायलट व्हायचे!’
संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची काकडी येथील श्री साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टला झालेली शैक्षणिक भेट विद्यार्थ्यांसाठी केवळ एक सहल न ठरता त्यांच्या करिअरच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा अनुभव ठरला.
विमानतळ बनले विद्यार्थ्यांचे ‘ओपन क्लासरूम’
संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा नुकताच २६वा स्थापना दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पुस्तकातील ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जगाचा अनुभव मिळावा, विविध क्षेत्रांची ओळख व्हावी आणि भविष्यातील करिअरच्या संधी समजाव्यात, या उद्देशाने संस्थेतर्फे अनुभवाधारित उपक्रम राबविले जातात.
याच उपक्रमाचा भाग म्हणून इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिर्डी येथील श्री साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टला भेट दिली. संस्थेचे ट्रस्टी सुमित दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राचार्य के. एल. दरेकर आणि कॅम्पस प्रशासक विजय भास्कर यांच्या नेतृत्वाखाली ९८ विद्यार्थी व स्टाफ या शैक्षणिक भेटीत सहभागी झाले.
धावपट्टीवर विमान उतरताना पाहण्याचा रोमांच
विमानतळ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विमानतळाची कार्यप्रणाली प्रत्यक्ष समजावून सांगितली. विमानांचे आगमन व प्रस्थान, प्रवाशांची सुरक्षा तपासणी, विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था, विविध तांत्रिक यंत्रणा व मशिनरी तसेच विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या यांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.
या भेटीतील सर्वाधिक रोमांचक क्षण ठरला तो दिल्लीहून शिर्डीकडे आलेले विमान प्रत्यक्ष धावपट्टीवर उतरताना पाहण्याचा. आकाशात दिसणारे विमान काही क्षणांत डोळ्यांसमोर धावपट्टीवर उतरताना पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल, उत्साह आणि आनंद स्पष्ट दिसत होता.
पायलटपासून तांत्रिक क्षेत्रापर्यंत करिअरच्या संधी
विमानतळ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांनी विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरच्या संधी जाणून घेतल्या. पायलट, विमानतळ सुरक्षा अधिकारी, तांत्रिक कर्मचारी, प्रशासन तसेच विमान वाहतूक क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.
संजीवनी सैनिकी स्कूलची राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील ओळख लक्षात घेऊन विमानतळावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष आपुलकीने स्वागत केले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली ग्रीटिंग कार्ड्स विमानतळ अधिकाऱ्यांना भेट देत कृतज्ञता व्यक्त केली.
विमानतळाचे डायरेक्टर कृष्णा पॉल यांनी विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी विशेष परवानगी दिली. यावेळी सहशिक्षक कटाळे सर, भांबरे सर तसेच संस्थेचे कल्चरल कॉर्डिनेटर शुभम जाधव सर उपस्थित होते.
‘मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी झटा’
यावेळी ट्रस्टी सुमित दादा कोल्हे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातील ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून जग समजून घेतले पाहिजे. त्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत. यासाठी संस्थेचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित दादा कोल्हे यांच्या पाठिंब्याने संजीवनीमध्ये अशा अनुभवाधारित उपक्रमांना विशेष महत्त्व दिले जाते.”
विमान पाहण्याच्या कुतूहलाला मिळाली स्वप्नांची भरारी!
विमानतळावरून परतताना विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विमान पाहण्याच्या कुतूहलाने सुरू झालेल्या या भेटीतून अनेक विद्यार्थ्यांच्या मनात पायलट, विमानतळ अधिकारी आणि तांत्रिक क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न आकाराला आले.
म्हणूनच ही भेट केवळ विमानतळाची माहिती देणारी ठरली नाही; तर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला ‘भरारी’ देणारा अनुभव ठरली. प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्याच्या संजीवनीच्या संकल्पनेचा प्रत्यय या शैक्षणिक भेटीतून आला.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
