कोपरगाव वृत्त वेध:
भारतीय टपाल विभागाच्या विविध जनकल्याणकारी योजना, गुंतवणूक योजना आणि नागरिकोपयोगी सेवांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोपरगाव येथे मंगळवारी भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. डाक अधीक्षक उमेश जनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रॅलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
डाक निरीक्षक संतोष केंद्रे यांनी टपाल विभागाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती देत त्यांच्या प्रचार-प्रसाराचा उद्देश स्पष्ट केला. कोरोना महामारीच्या काळात भारतीय टपाल विभागाने अत्यावश्यक सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बदलत्या डिजिटल युगात नागरिकांची गुंतवणूक अधिक सुरक्षित राहण्यासाठी नवजात बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उपलब्ध असलेल्या विविध बचत व विमा योजनांची माहितीही त्यांनी दिली. यावेळी नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कोपरगाव पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्तर रविंद्र परदेशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर शहरातील मुख्य रस्ता, प्रमुख बाजारपेठ, तहसील कार्यालयाचा मार्ग तसेच विविध प्रभागांतून जनजागृती रॅली काढण्यात आली.
रॅलीमध्ये टपाल खात्याच्या विविध बचत योजना, विमा योजना, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB), पार्सल सेवा तसेच अन्य नागरिकोपयोगी सेवांची माहिती देणारे फलक हातात घेण्यात आले होते. कोपरगाव पोस्ट कार्यालयातील कर्मचारी, शाखा कार्यालयांचे कर्मचारी, तसेच पोहेगाव, शिंगणापूर, साकरवाडी, कोळपेवाडी व शिर्डी उपडाक कार्यालयांतर्गत कर्मचारी आणि ग्रामीण डाकसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीचे शहरातील विविध भागांत नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
आपले मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.
ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी बातमी शेअर करा.अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
