कोपरगाव वृत्तवेध:
शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासह नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेला मोठी मंजुरी मिळाली आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेच्या नवीन ६५ सीट्सच्या मुतारी उभारणीच्या आराखड्यास शासनाची मान्यता मिळाली असून, यासाठी ४० लाख ४९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली.
६५ सीट्सची नवी सुविधा
मंजूर आराखड्यानुसार कोपरगाव शहरात यापूर्वीच १५० सीट्सच्या शौचालयांना मंजुरी मिळालेली आहे. आता त्यात आणखी ६५ सीट्सच्या मुतारीची भर पडणार आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठ, गर्दीची ठिकाणे आणि सार्वजनिक वापराच्या परिसरात नागरिकांना स्वच्छतासुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या काळात नागरिकांना विश्वासनाम्यातून दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले.
स्वच्छता थेट आरोग्याशी संबंधित
शहराची स्वच्छता ही केवळ सौंदर्याचा विषय नसून नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढविणे, नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देणे आणि शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावणे याला नगरपरिषदेकडून प्राधान्य दिले जात आहे.
मंजूर निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर करण्याची दक्षता घेतली जाणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र तसेच भौतिक व आर्थिक प्रगतीच्या आधारे पुढील निधी उपलब्ध होणार आहे.
‘स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त कोपरगाव’चा निर्धार
६५ सीट्सच्या नव्या मुतारीची मंजुरी हा कोपरगावच्या नागरी सुविधांच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे.
शहर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी अधिक सुविधायुक्त करण्याच्या दिशेने नगरपरिषदेकडून आगामी काळातही मूलभूत नागरी सुविधांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्पष्ट केले.
आपले मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.
ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी बातमी शेअर करा.अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
