कोपरगाव वृत्त वेध:
कोकमठाण येथील आत्मा मालिक कुस्ती केंद्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. केंद्राचे कुस्ती प्रशिक्षक विवेक नायकल यांची स्लोवाकिया येथे सुरू होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय फ्रीस्टाईल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. अवघ्या २९व्या वर्षी मिळालेली ही जबाबदारी कोपरगावच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
दि. २० पासून सुरू होणाऱ्या या जागतिक स्पर्धेत भारतीय पैलवानांच्या तयारीपासून ते प्रत्यक्ष सामन्यातील रणनीतीपर्यंत विवेक नायकल यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या जागतिक संघटनेच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
आत्मा मालिकच्या मातीत घडलेला प्रशिक्षक आता जागतिक आखाड्यात
विवेक नायकल यांचे वडील भारत नायकल हे आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.विवेक यांच्या निवडीबाबत भारत नायकल यांनी सांगितले की, विवेकची जडणघडण आत्मा मालिक कुस्ती केंद्रातच झाली. वयाच्या २९व्या वर्षी त्याला मिळालेली ही मोठी संधी असून, भारतीय संघासाठी तो निश्चितच योगदान देईल.
लेव्हल-२ कोचिंग कोर्समध्येही चमकदार कामगिरी
विवेक नायकल यांनी मार्चमध्ये झालेल्या लेव्हल-२ इंटरनॅशनल कोचिंग कोर्समध्ये ‘एफ’ श्रेणीत उत्तम यश संपादन केले होते. त्यापूर्वी २०२४ मध्ये अल्बेनिया-युरोप येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेतही त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली होती.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव आणि प्रशिक्षणातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर आता त्यांच्यावर भारतीय फ्रीस्टाईल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
भारतीय पैलवानांच्या कामगिरीसाठी महत्त्वाची भूमिका
जागतिक स्तरावरील या स्पर्धेत भारतीय पैलवानांची तयारी, तांत्रिक मार्गदर्शन, डावपेच आणि सामन्यांतील रणनीती यामध्ये विवेक नायकल यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आत्मा मालिक कुस्ती केंद्रातून घडलेला प्रशिक्षक आता भारतीय संघाची धुरा सांभाळणार असल्याने कोकमठाणसह कोपरगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
विवेक नायकल यांच्या निवडीबद्दल आत्मा मालिक परिवाराच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
