गुजरातच्या सहकार प्रतिनिधींना ‘समता’चा तंत्रज्ञानमंत्र

१२० प्रतिनिधींची समता पतसंस्थेला भेट; व्हाउचरलेस, पेपरलेस बँकिंगसह आधुनिक प्रणालींची घेतली माहिती

कोपरगाव वृत्तवेध:

महाराष्ट्रातील सहकाराची परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालून उभारलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या कामकाजाचा अनुभव घेण्यासाठी गुजरातमधील सहकार क्षेत्रातील तब्बल १२० प्रतिनिधींनी शनिवारी (दि. २२) समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीत ‘समता’च्या तंत्रज्ञानाधारित बँकिंग प्रणालीने गुजरातच्या प्रतिनिधींचे विशेष लक्ष वेधून घेतले.

गुजरात राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. जीवराजभाई गोधानी, संचालक अल्पेश धामेलिया, सीईओ दुष्यनसिंह वाघेला, सुरत जिल्हा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी फेडरेशनचे एम.डी. रमेशभाई लाठीया यांच्यासह गुजरातमधील विविध सहकारी पतसंस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व पदाधिकारी या शिष्टमंडळात सहभागी झाले होते. यामध्ये ४० महिला प्रतिनिधींचाही समावेश होता.

कोपरगाव गुजराती मित्रमंडळाच्या वतीने जेठालाल पटेल व अशोकशेठ जानी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर समता पतसंस्थेच्या आधुनिक कामकाजाची प्रतिनिधींना माहिती देण्यात आली.

विशेष म्हणजे गुजरातमधून आलेल्या प्रतिनिधींना संस्थेची माहिती त्यांच्या मातृभाषेत मिळावी, यासाठी व्हा. चेअरमन अरविंद पटेल व संचालिका अक्षरा अनुप पटेल यांनी गुजराती भाषेत चित्रफितीद्वारे ‘समता’चा प्रवास, सेवा व विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. गुजराती भाषेतील प्रभावी मांडणीचे प्रतिनिधींनी कौतुक करत अक्षरा पटेल यांचे अभिनंदन केले.

तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘समता’ची वेगळी ओळख

ऑडिट कंट्रोल रूमच्या माध्यमातून संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याची पद्धत, ऑनलाइन प्रणालीद्वारे कर्जवसुलीचे व्यवस्थापन तसेच सोनेतारण कर्ज वितरण प्रक्रिया अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान याबाबत चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, निलेश देशमाने व कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे यांनी सविस्तर माहिती दिली.

‘सहकार उद्योग मंदिरा’पासून मिनी मॉलपर्यंत

व्हाउचरलेस बँकिंग, पेपरलेस बँकिंग, ऑडिट कंट्रोल रूम, ऑनलाइन रिकव्हरी पॅटर्न, मोबाईल बँकिंग आणि सोनेतारण कर्ज वितरण प्रणाली याबाबत गुजरातच्या प्रतिनिधींनी विशेष उत्सुकता दाखविली.

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये सहकाराची मजबूत परंपरा आहे. त्यामुळे अशा भेटींमधून केवळ संस्थांची माहितीच नव्हे, तर तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि सहकार क्षेत्रातील नव्या प्रयोगांचीही देवाणघेवाण होत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक जितूभाई शहा, कचरू मोकळ, अश्विन व्यास यांच्यासह मुख्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या