कोपरगाव वृत्तवेध:
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे उद्योगविश्वातील कामाच्या पद्धती वेगाने बदलत आहेत. त्यामुळे केवळ पदवी मिळवून थांबण्यापेक्षा AI आणि आधुनिक तंत्रज्ञानातील नवे कौशल्य आत्मसात करणे हीच आजच्या रोजगारविश्वाची खरी गरज आहे, असे प्रतिपादन अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी जेपी मॉर्गन चेसच्या वरिष्ठ प्रॉडक्ट असोसिएट लावण्या गंगाराम यांनी केले.
संजीवनी विद्यापीठातील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (SET) मध्ये थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत व मार्गदर्शन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे होते. यावेळी व्हाईस चान्सलर डॉ. ए. जी. ठाकूर, डीन डॉ. कविता राणी पी. आणि डॉ. आर. प्रिया उपस्थित होते.
‘नोकरी टिकवायची असेल तर कौशल्ये वाढवा’
उद्योगविश्वात केवळ अनुभवाला महत्त्व राहिलेले नाही. नवीन तंत्रज्ञानानुसार आपण काय शिकलो आणि त्या ज्ञानाचा प्रभावी वापर कसा करतो, याला अधिक महत्त्व आहे. सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात केल्यास रोजगाराच्या संधी अधिक सक्षम आणि शाश्वत होतील, असे गंगाराम यांनी सांगितले.विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, चांगले मित्र जोडावेत आणि प्रत्येक सत्रात किमान एक प्रकल्प पूर्ण करून स्वतःचे कौशल्य विकसित करावे. स्वतःचे व्हिजन निश्चित करून त्यानुसार भविष्यातील वाटचाल करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
डिग्री पासपोर्ट, कौशल्ये व्हिसा!
‘डिग्री ही पासपोर्टसारखी असते, तर कौशल्ये व्हिसासारखी असतात,’ असे सांगत डॉ. ए. जी. ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाचे महत्त्व पटवून दिले. डिग्रीमुळे मुलाखतीची संधी मिळते; मात्र आपल्याकडील कौशल्येच नोकरी टिकवून ठेवतात. त्यामुळे विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्यविकास उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
प्रारंभी डॉ. कविता राणी पी. यांनी स्वागत करून एसईटीची ध्येय-धोरणे स्पष्ट केली. संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी संदेशाद्वारे नवागत विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि उज्ज्वल करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.
सोशल मीडिया वापरताना सावध; करिअरवर होऊ शकतो परिणाम
एआयच्या युगात शिक्षण पूर्ण होत असल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठ्या संधी उपलब्ध आहेत. अभ्यासक्रम एआय आधारित असल्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे. मात्र सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करणे गरजेचे आहे. नामांकित कंपन्या उमेदवारांची निवड करताना त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलकडेही लक्ष देतात. त्यामुळे सोशल मीडियाचा चुकीचा वापर करिअरवर परिणाम करू शकतो, असा इशारा अमित कोल्हे यांनी दिला.
संजीवनी विद्यापीठात जपानी, रशियन, जर्मन आणि कोरियन भाषा शिकण्याची संधी उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेऊन आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधींसाठी स्वतःला तयार करावे. तसेच शिस्त आणि उपस्थितीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यशस्वी करिअरची सुरुवात चांगल्या शिस्तीतूनच होते, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
