कोपरगाव वृत्तवेध:
शहरापासून ग्रामीण भागापर्यंत वाढलेल्या चोरीच्या घटनांनी नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घरफोड्या, चेन स्नॅचिंग, विहिरीवरील विद्युत मोटारी आणि केबल चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता वाढली असून, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी शहर व ग्रामीण पोलिसांची बैठक घेत ‘चोरीच्या घटनांना तातडीने आळा घाला आणि गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण करा,’ असे स्पष्ट निर्देश दिले.
शहर आणि ग्रामीण भागातील वाढत्या चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत आमदार काळे यांनी पोलीस निरीक्षकांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, त्यामुळे पोलिसांनी अधिक सतर्कतेने आणि परिणामकारक पद्धतीने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या मोटारी, केबल चोरट्यांच्या निशाण्यावर
विहिरीवरील विद्युत मोटारी आणि केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मोटार-केबल चोरीमुळे थेट आर्थिक नुकसान होत असून, सिंचन व्यवस्थेवरही परिणाम होत आहे. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला प्राधान्य द्यावे, अशी सूचना आमदार काळे यांनी केली.
रात्रीची गस्त वाढवा; संशयितांवर नजर ठेवा
शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, बसस्थानक परिसर आणि संवेदनशील ठिकाणी नियमित पोलीस गस्त वाढवावी. ग्रामीण भागातही रात्रीची विशेष गस्त पथके तैनात करावीत. संशयित व्यक्ती आणि वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवून चोरीच्या घटना घडण्यापूर्वीच त्यांना रोखण्याची यंत्रणा मजबूत करा, असे निर्देश देण्यात आले.

उपलब्ध सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर करून चोरीच्या गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करावा. आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. केवळ गुन्हा घडल्यानंतर तपास करण्याऐवजी गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी ‘प्रिव्हेंटिव्ह पोलिसिंग’वर भर द्यावा, असेही आमदार काळे यांनी सांगितले.
‘तक्रारींकडे दुर्लक्ष नको’
नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी. पोलिसांच्या कामातून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे. कोपरगाव तालुक्यात यापूर्वी काही पोलीस निरीक्षकांनी प्रभावी काम करून गुन्हेगारीवर वचक निर्माण केला होता. त्या कार्यपद्धतीतील प्रभावी उपाययोजनांचा अभ्यास करून त्या सध्याच्या परिस्थितीत राबवाव्यात, अशी सूचना आमदार काळे यांनी केली. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करून गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण करा, असे आमदार आशुतोष काळे यांनी पोलिसांना बजावले.
बैठकीस कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे आणि कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड उपस्थित होते.
आपले मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.
ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी बातमी शेअर करा.अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
