कोपरगाव | वृत्तवेध प्रतिनिधी
भगवान श्री जगन्नाथांच्या रथयात्रेने रविवारी कोपरगाव शहराला भक्तिरसात न्हाऊ घातले. इस्कॉन कोपरगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य रथयात्रेत हरिनाम संकीर्तन, जयघोष आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शहर आध्यात्मिक वातावरणाने भारावून गेले. यावेळी आमदार विवेक कोल्हे यांनी रथयात्रेत सहभागी होत भगवान श्री जगन्नाथांचे दर्शन घेतले आणि रथयात्रेस शुभेच्छा दिल्या.
रथयात्रेदरम्यान बोलताना आमदार विवेक कोल्हे यांनी इस्कॉन संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. “इस्कॉन ही संस्था केवळ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणारी संस्था नसून युवा पिढीमध्ये संस्कार, शिस्त, नैतिक मूल्ये आणि अध्यात्माची जपणूक करणारी एक प्रभावी चळवळ आहे,” असे ते म्हणाले.
वाढत्या व्यसनाधीनतेच्या आणि बदलत्या जीवनशैलीच्या काळात तरुणांना सकारात्मक विचारसरणी आणि भारतीय संस्कृतीशी जोडण्याचे मोलाचे कार्य इस्कॉन करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, रथयात्रेच्या स्वागतासाठी शहरात स्वच्छता अभियानही राबविण्यात आले होते. स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात भगवान श्री जगन्नाथांच्या रथाचे भाविकांनी फुलांचा वर्षाव करत स्वागत केले. यावेळी आमदार कोल्हे यांनी शहरवासीयांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी इस्कॉनचे महंत व पदाधिकारी, नगराध्यक्ष पराग संधान, मच्छिंद्र केकान, विजयराव आढाव, राजेंद्र सोनवणे, प्रशांत कडू, विनोद राक्षे, बाळासाहेब नरोडे, प्रसाद आढाव, कैलास मंजुळ, संतोष चवंडके, स्वप्निल मंजुळ, सरपंच संदीप देवकर, डॉ. अमोल अजमेरे, संजय उदावंत, दत्तू पगारे, रोहित कनगरे, स्वराज सूर्यवंशी, अर्जुन माकोने, शैलेश नागरे, आयुब कच्छी यांच्यासह स्वयंसेवक, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रथयात्रेतील भक्तिमय वातावरण, हरिनामाचा अखंड गजर आणि समाजाला एकत्र आणणारा संदेश यामुळे कोपरगावकरांना अध्यात्म, सेवा आणि संस्कारांचा नवा अनुभव मिळाला. या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक मूल्ये अधिक बळकट होतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
