कोपरगाव | वृत्तवेध प्रतिनिधी
संवत्सर ग्रामस्थांच्या दीर्घकालीन पाणीप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्य शासनाने पाणीपुरवठा योजनेच्या निधीत तब्बल १ कोटी १० लाख रुपयांची वाढ केली आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या या योजनेस आता ४ कोटी ५७ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने रखडलेल्या कामाला गती मिळणार असून ग्रामस्थांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यापूर्वी संवत्सर पाणीपुरवठा योजनेसाठी ३ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कामात आवश्यक तांत्रिक बदल, वाढलेला वस्तू व सेवा कर (GST) आणि इतर खर्चामुळे मंजूर निधीत काम पूर्ण करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे अतिरिक्त निधीची गरज निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी प्रश्नाचा पाठपुरावा करत पावसाळी अधिवेशनातही शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद प्रशासनाने सुधारित अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. अखेर शासनाने प्रस्तावाला मंजुरी देत योजनेच्या निधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला.
सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे योजनेसमोरील आर्थिक व तांत्रिक अडथळे दूर होणार असून काम पूर्णत्वास नेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी संवत्सर गावाला शाश्वत व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, वाढीव निधीस मंजुरी मिळाल्यानंतर संवत्सर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत
