कोपरगाव वृत्तवेध:
विद्यार्थ्यांना केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण, कौशल्य, संशोधन, इंटर्नशिप आणि रोजगाराच्या संधींसाठी सक्षम करण्याच्या संजीवनी विद्यापीठाच्या प्रयत्नांवर रशियाच्या महावाणिज्य दूतावासातील उप-वाणिज्यदूत मात्वेई फेटिसोव्ह यांनी कौतुकाची मोहोर उमटविली. त्यांच्या या गौरवोद्गारांमुळे संजीवनी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वाटचालीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
रशियातील शैक्षणिक, संशोधन, इंटर्नशिप आणि रोजगाराच्या संधींच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील रशियाच्या महावाणिज्य दूतावासातील उप-वाणिज्यदूत मात्वेई फेटिसोव्ह, एपी ग्लोबलचे राजकीय व संस्थात्मक युतींसाठी धोरणात्मक प्रमुख शिवेंद्रसिंह चौहान आणि आर्थिक सल्लागार युगेन यांनी संजीवनी विद्यापीठाला भेट दिली. यावेळी रशियातील विद्यापीठांशी संयुक्त संशोधन, उच्च शिक्षण, इंटर्नशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
संजीवनी विद्यापीठाचे अध्यक्ष अमित कोल्हे, कुलगुरू डॉ. ए. जी. ठाकूर तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता यावेळी उपस्थित होते. डॉ. ठाकूर यांनी प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करून विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम, आधुनिक शैक्षणिक सुविधा, संशोधनाच्या संधी, उद्योगविश्वाशी असलेले संबंध आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आंतरराष्ट्रीय संधींची माहिती दिली.

रशियात भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी
रशियातील विविध क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे मात्वेई फेटिसोव्ह यांनी सांगितले. मात्र, रशियात शिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीने रशियन भाषेचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी रशियन भाषेचे प्रशिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय संधींसाठी स्वतःला तयार करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विशेष म्हणजे, संजीवनी विद्यापीठात विद्यार्थ्यांना रशियन भाषा शिकविली जात असल्याचे समजल्यानंतर फेटिसोव्ह यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता आंतरराष्ट्रीय शिक्षण, कौशल्ये, इंटर्नशिप आणि रोजगारासाठी तयार करण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
रशियन विद्यापीठांशी शैक्षणिक करार
संजीवनी विद्यापीठाचे रशियातील विविध विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार आहेत. या करारांच्या माध्यमातून विद्यार्थी रशियात जाऊन इंटर्नशिप, संशोधन प्रकल्प तसेच उच्च शिक्षण घेत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
रशियन प्रतिनिधी मंडळाने विद्यापीठातील विविध विभाग, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची पाहणी केली. विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधत कौशल्याधारित शिक्षण, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या उपक्रमांची माहिती घेत प्रतिनिधी मंडळाने विद्यापीठाच्या कार्याचे कौतुक केले.
संजीवनी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक उपक्रमांना रशियाच्या महावाणिज्य दूतावासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली ही सकारात्मक दाद विद्यापीठाच्या जागतिक शैक्षणिक वाटचालीला बळ देणारी ठरली आहे.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
