समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये संतविचारांचा जागर; आषाढी एकादशीनिमित्त भव्य कीर्तन स्पर्धेत झेनिथ हाऊस विजेता

कोपरगाव वृत्तवेध: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य कीर्तन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संतविचार, भक्ती, समाजप्रबोधन आणि भारतीय संस्कृतीचा प्रभावी जागर घडविला.

इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी अभंग, भारूड आणि संतवाङ्मयावर आधारित अभ्यासपूर्ण कीर्तन सादर करत आपल्या ओजस्वी वाणी, प्रभावी निरूपण आणि भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.


कॉसमॉस, ओॲसिस, प्लॅटिनम आणि झेनिथ या चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकरी परंपरेतील संतसाहित्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

स्पर्धेसाठी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. मोनिकाताई येवले आणि ह.भ.प. मयूर महाराज येवले यांनी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सुहासिनीताई कोयटे (काकीजी), कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे, प्राचार्य समीर अत्तार आणि उपप्राचार्या मोहिनी जगताप उपस्थित होते.


मार्गदर्शन करताना ह.भ.प. मोनिका येवले यांनी कीर्तन हे केवळ कलाप्रकार नसून संस्कार, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. संतांचे विचार आचरणात उतरविल्यासच त्यांचे खरे महत्त्व अधोरेखित होते, असे नमूद करत त्यांनी विद्यार्थ्यांना सत्य, सेवा, सदाचार आणि भक्तीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.


स्पर्धेचा निकाल जाहीर करताना ह.भ.प. मयूर महाराज येवले यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. संतविचारांचा वारसा जपण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर असून भविष्यात इंग्रजी भाषेतूनही संतसाहित्याचा संदेश जगभर पोहोचविणारे कीर्तनकार समता इंटरनॅशनल स्कूलमधून घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जयश्री श्रीवास्तव, शिल्पा इंगळे, सुजाता वाणी आणि नंदिनी वक्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चुरशीच्या स्पर्धेत झेनिथ हाऊसने प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर विजेतेपद पटकावत चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी प्रदान करण्यात आली.


कार्यक्रमाची आकर्षक सजावट कला शिक्षक विभावरी नगरकर, मंगेश गायकवाड आणि गोरख बोरसे यांनी केली. संपूर्ण नियोजन आणि समन्वय किरण लद्दे व आकाश मिश्रा यांनी सांभाळला. सूत्रसंचालन निधी जगताप, गौरव काकडे आणि नंदिनी वक्ते यांनी केले, तर शिल्पा इंगळे यांनी आभार प्रदर्शन केले.


आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली ही कीर्तन स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये संतपरंपरा, भारतीय संस्कृती, भक्तीभाव आणि सामाजिक मूल्यांची रुजवण करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरली.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या