कोपरगाव वृत्तवेध:
नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पौराणिक महत्त्व असलेल्या कोपरगावमध्ये देशभरातून येणाऱ्या साधू-संत आणि भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून रस्ते, घाट आणि प्रवासी सुविधांसाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याशिवाय फळबाग उत्पादक सहकारी संस्थांतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणीही त्यांनी केली.
काळेंच्या मागण्यांत नेमके काय?
कुंभमेळ्याच्या काळात गोदावरी स्नानासाठी कोपरगावात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे रांजणगाव देशमुख–झगडे फाटा, पढेगाव–उक्कडगाव आणि कोळगाव पाटी–देर्डे फाटा या महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी निधी देण्याची मागणी काळे यांनी केली.
तसेच चासनळी, मोर्वीस आणि कोकमठाण येथे नवीन घाट, तर कुंभारी, कोपरगाव बेट आणि संवत्सर घाटांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. घाटांना जोडणारे रस्ते, विद्युत रोषणाई आणि परिसर सुशोभीकरणालाही प्राधान्य देण्याची मागणी आहे.
रेल्वे स्थानकावर सुविधांचा आग्रह
कोपरगाव बसस्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते, स्वच्छतागृहे, विश्रामगृह, सुसज्ज प्रतीक्षालय आणि अन्य प्रवासी सुविधांचा विकास करण्याची गरजही काळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
फळबाग शेतकऱ्यांसाठीही कर्जमाफीची मागणी
कोपरगाव मतदारसंघातील काही फळबाग उत्पादक सहकारी संस्थांमधील पात्र शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. या संस्था जिल्हा सहकारी बँकेच्या सभासद असून नियमित कर्जफेड करणाऱ्या आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या संस्थांचा कर्जमाफी योजनेत समावेश करावा, अशी मागणी आमदार काळे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
या तिन्ही मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, त्यांनी मागण्यांना अनुकूल प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
चौकट
“कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगावातील पायाभूत सुविधा सक्षम करणे ही काळाची गरज आहे. भाविकांना सुविधा मिळण्यासोबतच फळबाग उत्पादक पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे.” — आमदार आशुतोष काळे
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
